Pen Ganesh Idols Pudhari
रायगड

Pen Ganesh Idols: शाडूच्या गणेशमूर्तींची पेण पॅटर्नमध्ये मुसंडी; पीओपीचा टक्का घटला

ग्राहकांनीच पर्यावरणपूरकतेचा विचार स्विकारल्याने घडतेय परिवर्तन

पुढारी वृत्तसेवा

जयंत धुळप

रायगड: जागतिक स्तरावर नावाजलेल्या पेणच्या गणेशमूर्ती उद्योगात सध्या मोठे 'पर्यावरणपूरक' परिवर्तन पाहायला मिळत आहे. गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत यंदा पेणमधील मूर्तिकारांनी शाडूच्या मातीपासून बनणाऱ्या पर्यावरणपूरक गणेशमूर्तींच्या उत्पादनात तब्बल तीन पटीने वाढ केली आहे.

ग्राहक, गणेशमंडळे आणि परदेशातून वाढलेली मागणी, तसेच आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरामुळे पीओपीच्या (प्लास्टर ऑफ पॅरिस) मूर्तींचे वर्चस्व हळूहळू कमी होत असून शाडूच्या मूर्तींचा टक्का लक्षणीयरीत्या वाढला आहे.

पेण तालुका आणि शहर मिळून दरवर्षी सुमारे ७५ ते ८० लाख गणेशमूर्तींची निर्मिती केली जाते. या भव्य उद्योगात यंदा शाडूच्या मूर्तींची संख्या २५ ते ३० लाखांच्या घरात पोहोचली आहे.

ग्राहक मानसिकतेत सकारात्मक बदल, परदेशातही शाडू मातीलाच परवानगी

सुशिक्षित आणि पर्यावरणस्नेही नागरिकांकडून तसेच अनेक गृहनिर्माण संस्थांकडून गेल्या पाच वर्षापासून शाडूच्याच गणेशमूर्तींना प्राधान्य दिले जात असून त्यांची थेट मागणी नोंदवली जात आहे.

अमेरिका, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया आणि आखाती देशांमध्ये पीओपी गणेशमुर्तींना पूर्णपणे बंदी घालण्यात आहे. परिणामी निर्यात होणाऱ्या पेणच्या मूर्तींमध्ये पर्यावरणस्नेही शाडू मातीच्याच आणि नैसर्गिक रंगांचा वापर केलेल्या गणेशमूर्तींना सर्वाधिक पसंती मिळत आहे.

परिणामी पेणच्या गणेशमुर्तीकारांनी स्वाभावीकच आपले गेल्या अनेक वर्षांपासून जाेडलेले परदेशातील ग्राहक अबाधीत राखण्याकरिता शाडू माती व कागदाचा लगदा यांच्या वा यांच्या मिश्रणाच्या गणेशमुर्ती तयार करण्यावर भर दिला. त्यामुळे शाडू मातीच्या गणेशमुर्तीत वाढ झाली आणि पीओपी गणेशमुर्तींच्या संख्येत घट झाल्याचे पेणमधील गणेशमुर्तीकारांनी सांगीतले.

पेणच्या कारागिरांचे अफाट कौशल्य

शाडू माती वाळताना तडे जाण्याची शक्यता असते. मात्र, पेणच्या मूर्तिकारांनी आपल्या पारंपरिक कौशल्यात आधुनिक तंत्रज्ञानाची सांगड घालत शाडूच्या मूर्तींमध्येही पीओपीसारखीच अत्यंत बारीक आणि सुबक नक्षीकाम (फिनिशिंग) साध्य करण्यात अत्यंत मेहतीने यश मिळवीले आहे.

परिणामी पेणमधील गणेशमुर्ती ज्या पवित्र, लाेभस आणि शांत चेहऱ्याच्या दृष्यमानतेसाठी सूप्रसिद्ध आहे, तीच दृष्यमानता शाडू मातीच्या गणेशमुर्तीत अबाधीत राखण्यात पेणच्या गणेशमुर्तीकारांनी अफाट काैशल्याने यश मिळवीले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT