Solar Pudhari
रायगड

PM Surya Ghar scheme: पीएम सूर्यघर योजनेत पेण वीज मंडळाचा डंका! भांडुप-कल्याण परिमंडलात रायगड अव्वल

6 हजारांहून अधिक घरांवर सौर प्रकल्प यशस्वी

पुढारी वृत्तसेवा

रायगड: महिना 300 युनिटपर्यंत वीजवापर असलेल्या घरगुती ग्राहकांचे वीजबिल शून्य करण्यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेल्या प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत महावितरणच्या रायगड जिल्ह्यातील पेण वीज मंडळाने बाजी मारली आहे.

महावितरणच्या भांडुप आणि कल्याण या दोन्ही परिमंडलांमध्ये मिळून झालेल्या एकूण कामात एकट्या पेण मंडळाने सर्वाधिक कामगिरी करत अव्वल स्थान पटकावले आहे. मे 2026 पर्यंत पेण मंडळातील तब्बल 6 हजार 151 ग्राहकांच्या घरांवर सौरऊर्जा प्रकल्प यशस्वीपणे बसविण्यात आले आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीवर भर देण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार महावितरणने भांडुप आणि कल्याण परिमंडलात एकूण 13 हजार 448 लाभार्थी या योजनेचा लाभ घेत आहेत. यामध्ये महाराष्ट्राने देशभरात 1 लाख 8 हजार 327 स्थापित सौर प्रकल्पांसह प्रथम क्रमांक पटकावला आहे.

भांडुप आणि कल्याण परिमंडळात पेणचा दबदबा

भांडुप आणि कल्याण परिमंडलात मे 2026 पर्यंत झालेल्या एकूण 13 हजार 448 सौर प्रकल्पांपैकी एकट्या भांडुप परिमंडलात 8 हजार 722 प्रकल्प पूर्ण झाले आहेत. यात पेण-रायगड मंडळाने इतर सर्व मंडळांना मागे टाकले आहे.

भांडुप परिमंडळात पेण मंडळाने सर्वाधिक 6 हजार 151 प्रकल्पांसह अव्वल स्थान गाठले असून, त्याखालोखाल वाशी मंडळात 2 हजार 132 आणि ठाणे मंडळात 439 प्रकल्प पूर्ण झाले आहेत. दुसरीकडे कल्याण परिमंडळात एकूण 4 हजार 726 प्रकल्पांपैकी वसई मंडळात 1 हजार 880, पालघर मंडळात 1 हजार 364, कल्याण-2 मंडळात 876 आणि कल्याण-1 मंडळात 606 ग्राहकांनी या योजनेचा लाभ घेतला आहे.

25 वर्षे मोफत वीज,थेट उत्पन्न

पीएम सूर्यघर योजने अंतर्गत घरगुती ग्राहकांना छतावर सौर प्रकल्प बसवण्यासाठी केंद्र सरकारकडून थेट अनुदान दिले जाते. यामध्ये 1 किलोवॅट क्षमतेसाठी 30 हजार रुपये, 2 किलोवॅटसाठी 60 हजार रुपये आणि 3 किलोवॅटसाठी 78 हजार रुपयांचे अनुदान थेट दिले जाते.

1 किलोवॅट क्षमतेच्या प्रकल्पातून दरमहा सुमारे 120 युनिट वीज निर्माण होते. एकदा हा सौर प्रकल्प बसवला की पुढील 25 वर्षे वीजनिर्मिती होते. घरगुती गरजेपेक्षा जास्त झालेली वीज महावितरणला विकून ग्राहकांना अतिरिक्त उत्पन्न मिळवण्याची संधीही या योजनेमुळे उपलब्ध झाली आहे.

बीपीएलसाठी स्मार्ट योजना

केंद्र सरकारच्या अनुदानासोबतच राज्य सरकारने राज्यातील दारिद्य्ररेषेखालील (बीपीएल) आणि महिना 100 युनिटपेक्षा कमी वीज वापर असलेल्या 5 लाख गरीब ग्राहकांसाठी स्मार्ट योजना सुरू केली आहे. या योजनेत प्रति किलोवॅट खर्च 45 हजार 495 रुपये निश्चित केला असून, केंद्र व राज्याच्या एकत्रित अनुदानामुळे ग्राहकांना अतिशय नाममात्र रक्कम भरावी लागणार आहे.

यामध्ये दारिद्य्ररेषेखालील (बीपीएल) ग्राहकांना तब्बल 95 टक्के सूट मिळणार असून त्यांना केवळ 2 हजार 500 रुपये भरावे लागतील. तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील अनुसूचित जाती व जमातीच्या ग्राहकांना 90 टक्के सूट मिळून फक्त 5 हजार रुपये आणि सामान्य प्रवर्गातील गरीब ग्राहकांना 80 टक्के सूट मिळून केवळ 10 हजार रुपये भरावे लागणार आहेत.

पेण मंडळा अंतर्गत रायगड जिल्ह्यातील जास्तीत जास्त ग्राहकांनी, विशेषतः आर्थिक दुर्बल घटकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घेऊन आपले वीजबिल शून्य करावे, या करिता प्रचार आणि प्रसार गावांगावांत जावून करण्यात येत आहे. त्यास प्रतिसाद देखील मिळत आहे. चालू महिन्यात मोठ्या प्रमाणात प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेतून घरे प्रकाशमान करण्याचे नियोजन आहे.
- धनराज बिक्कर, मुख्य अभियंता, महावितरण, पेण-रायगड

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT