पनवेल/ रसायनी : मुसळधार पावसामुळे रसायनी परिसरातील पाताळगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली. त्यामुळे आपटा गावात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. नदीचे पाणी पात्राबाहेर आल्याने गावातील सखल भाग जलमय झाले आहेत.
पुराच्या पाण्याने आपटा एसटी स्थानक पूर्णपणे पाण्याखाली गेले होते. परिसरातील वाहतूक विस्कळीत झाली आहे. एसटी बससेवेवरही त्याचा परिणाम झाला असून, प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. गावातील प्रसिद्ध गणेश मंदिर परिसरातही पुराचे पाणी शिरल्याने भाविकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
मंदिर परिसरासह आजूबाजूच्या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने नागरिकांची ये-जा धोकादायक बनली आहे. स्थानिक प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून असून, नागरिकांना नदीकाठ व पाण्याखाली गेलेल्या भागात जाणे टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आपत्कालीन यंत्रणा सतर्क ठेवण्यात आल्या असून, परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवले जात आहे. पाताळगंगा नदीच्या पाण्याची पातळी आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.