ST bus MSRTC  ST bus MSRTC
रायगड

ST Bus Delay: एसटी बस नियोजित वेळेत न आल्याने ज्येष्ठ प्रवाशांची फरफट; टॅक्सीचा आधार घेण्याची वेळ

भविष्यात प्रभावी यंत्रणा उभी करण्याची मागणी

पुढारी वृत्तसेवा

अलिबाग: डोंगरी येथून मुंबईकडे जाणारी एसटी बस नियोजित वेळेत न आल्याने चार अनारक्षित प्रवासी आणि एक आरक्षणधारक ८७ वर्षीय एक ज्येष्ठ नागरिक यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला.

बसची बराच वेळ प्रतीक्षा करूनही ती न आल्याने प्रवाशांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले. विशेष म्हणजे बस का आली नाही किंवा पर्यायी व्यवस्था काय आहे, याबाबत एसटी प्रशासनाकडून कोणतीही माहिती देण्यात आली नसल्याने प्रवाशांनी संताप व्यक्त केला.

आरक्षणधारक प्रवासी केवलचंद जैन यांना चिचबंदर-डोंगरी परिसरातून थेट मुंबई सेंट्रलसाठी टॅक्सी उपलब्ध झाली नाही. त्यामुळे नाईलाजास्तव त्यांनी सामानासह १०० रुपये देऊन हमालाच्या मदतीने मशीद बंदर रेल्वे स्थानक गाठले.

तेथून संध्याकाळच्या गर्दीच्या वेळी मुंबई सेंट्रलकडे जाण्याचा प्रयत्न केला असता प्रचंड गर्दीमुळे प्रवास शक्य झाला नाही. परिणामी त्यांना छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथे जाऊन तेथून पनवेलकडे जाणारी लोकल ट्रेन पकडावी लागली.

पनवेल येथे पोहोचल्यानंतर त्यांनी अलिबागकडे जाणाऱ्या एसटीने पुढील प्रवास केला. मात्र, अलिबाग बसस्थानकात बोर्लीकडे जाण्यासाठी तब्बल दोन ते तीन तास बस उपलब्ध झाली नाही. अखेर रात्री उशिर झाल्याने आणि अन्य पर्याय नसल्याने त्यांनी ६०० रुपये खर्च करून खासगी रिक्षाने बोर्ली गाठले.

अशा प्रकारे हमाल, रेल्वे आणि खासगी रिक्षा यासाठी त्यांच्यावर मोठा अतिरिक्त आर्थिक भार पडला. वयोमानामुळे सामानासह झालेली धावपळ, गर्दीतून केलेला प्रवास आणि रात्री उशिरा घरी पोहोचल्याने त्यांना मानसिक व शारीरिक त्रासही सहन करावा लागला.

केवलचंद जैन म्हणाले, आरक्षण करूनही बस मिळाली नाही, ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. या वयात सामान घेऊन स्थानकान् स्थानक फिरावे लागले. हमालाची मदत घ्यावी लागली, गर्दीमुळे रेल्वे बदलावी लागली आणि शेवटी बोर्लीसाठी ६०० रुपये रिक्षाभाडे द्यावे लागले. एसटी प्रशासनाने वेळेत माहिती दिली असती तर हा सर्व मनस्ताप टाळता आला असता. ज्येष्ठ नागरिकांचा विचार करून अशा प्रकारांची पुनरावृत्ती होऊ नये."

एसटीच्या नियमानुसार, बस फलाटावर लावण्यापूर्वी वाहकाने मुंबई सेंट्रल येथून आरक्षण चार्ट ताब्यात घेऊन आरक्षण केलेल्या प्रवाशांशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधणे अपेक्षित असते. मात्र, या प्रकरणात चालक-वाहकांकडून कोणताही संपर्क साधण्यात आला नसल्याचा आरोप जैन यांनी केला आहे.

मुरुड आगार प्रमुख राहुल शिंदे यांनी सांगितले की, संबंधित चालक-वाहकांनी मुंबई सेंट्रलऐवजी बस थेट दादर येथे नेली होती. त्यामुळे आरक्षणधारक प्रवाशांनी पर्यायी खासगी वाहनाने मुंबई सेंट्रल गाठून पुढील प्रवास करणे अपेक्षित होते.

नियोजनावर प्रश्नचिन्ह

या संपूर्ण घटनेमुळे एसटी प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. बसच्या मार्गात किंवा वेळेत बदल झाल्यास त्याची माहिती प्रवाशांना तातडीने देणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. विशेषतः ज्येष्ठ नागरिकांना झालेला अतिरिक्त आर्थिक, मानसिक आणि शारीरिक त्रास लक्षात घेऊन या घटनेची चौकशी करून झालेल्या खर्चाची भरपाई करावी तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी प्रभावी यंत्रणा उभारावी, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT