महाड (रायगड) : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या महाड शहराध्यक्ष पराग वडकी यांना निनावी पत्राद्वारे हत्या करण्याची धमकी दिल्याची खळबळ जनक घटना समोर आली असून याप्रकरणी महाड शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करणार असल्याची माहिती या पक्षाचे रायगड जिल्हा अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना दिली आहे.
यासंदर्भात शनिवारी (दि.30) रोजी आपण महाड शहर पोलीस निरीक्षक संतोष जाधव यांना भ्रमणध्वनीद्वारे याची कल्पना दिली असून रविवारी (दि.31) सकाळी यासंदर्भात लिखित तक्रार आपण दाखल करणार असल्याचे स्पष्ट केले. जिल्हाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी या यासंदर्भात अधिक स्पष्ट केले की मागील काही दिवसापासून स्थानिक नागरी प्रश्न विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट संपूर्ण जिल्ह्यामध्ये आक्रमकपणे जनतेची समस्या शासनासमोर मांडत आहे.
संदर्भात काही समाजकंटकांकडून शहराध्यक्ष पराग वडकी यांना निनावी पत्राद्वारे जीवे मारण्याची धमकी दिली असून या पत्रात तुझा कार्यक्रम करणार असे बजाविण्यात आले असून अपघात कशाला बोलतात हे माहित आहे ना अशा प्रकारे विचारणा करून जीवे बांधण्याची व हत्या करण्याची धमकी देण्यात आल्याचे रवींद्र चव्हाण यांनी स्पष्ट केले. जनतेचे प्रश्न कायदेशीर रित्या उपस्थित करणाऱ्या कार्यकर्त्यांविरोधात दिल्या जाणाऱ्या धमक्या लक्षात घेता महाड शहर कोणत्या मार्गाने चालले आहे अशी विचारणा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केली असून पोलीस प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन कार्यवाही करावी अशी मागणी केली आहे.