Panvel Water Crisis Pudhari
रायगड

Panvel Water Crisis: पनवेलच्या जीवनवाहिन्या कोरड्या ठाक; १८ हजार नागरिकांची पाण्यासाठी वणवण

नद्यांची पात्रे पडली कोरडी

पुढारी वृत्तसेवा

विक्रम बाबर

पनवेल: पनवेल तालुक्यात गेल्या काही महिन्यांपासून तापमान वाढल्याने पाणीपातळी झपाट्याने घटू लागली आहे. येथील नद्या आटल्याने मोठे संकट निर्माण झाले आहे. त्यामुळे अनेकांना विकतच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे.

२०२५ मध्ये जवळपास सहा महिने पाऊस झाला. नोव्हेंबर महिन्यापर्यंत पाऊस झाल्याने नदीपत्रांत अधिक काळ पाणी साचून राहील, असा अंदाज वर्तवण्यात आला होता. तसेच थंडीच्या वातावरणामुळे नद्यांमधील पाणीसाठा टिकून होता.

मात्र मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून तालुक्यात तापमान वाढण्यास सुरुवात झाली आणि नद्यांच्या पाणी पातळीत कमालीची घट झाली. त्याची झळ नागरिकांना बसत आहे. सध्या जून महिना उजाडला असून पावसाचा पत्ता नाही. त्यामुळे नद्यांमधील पाणी मोठ्या प्रमाणात आटले आहे.

बहुतांश ठिकाणी नदीपात्र कोरडे पडले आहे. नदीच्या पाणीपातळीवर अनेक गावातील विहिरींची पातळी अवलंबून असते. आदिवासी भागातील विहिरींचे पाणीही आटले आहे.अनेक आदिवासी बांधवांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. त्यामुळे पिण्याचा पाण्याचा प्रश्न उभा ठाकला आहे.

पनवेल तालुक्यात लोकसंख्या झपाट्याने वाढत असल्याने त्यांना पाणीपुरवठा करणारी साधने कमी पडत आहेत. काही ठिकाणी बोरवेललाही पाणी लागत नाही. तालुक्यातील अनेक विहिरी, बोअरवेल व नद्या कोरड्या पडल्याने नागरिकांना टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे.

काही ठिकाणी स्थानिक नागरिकांना पहाटे इतर भागातून पाणी आणावे लागत असून काहींना पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे. त्यामुळे पाऊस कधी पडणार आणि पाणीटंचाई कधी दूर होणार या विवंचनेत तालुक्यातील नागरिक आहेत.

रायगड जिल्ह्यात वाढत्या उष्णतेमुळे निर्माण झालेल्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद रायगडच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत विविध तालुक्यांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. तालुक्यात १० गावे व ८ वाड्यांसाठी ९ टँकरद्वारे १८ हजार ५५३ नागरिकांना पाणीपुरवठा केला जात आहे.

गाव-वाड्यांना टँकरने पाणीपुरवठा

पनवेल तालुक्यातील अनेक विहिरी, बोअरवेल आणि नद्या कोरड्या पडल्याने नागरिकांना टँकरच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागत आहे. काही ठिकाणी स्थानिकांना पहाटे इतर भागातून पाणी आणावे लागत आहे. पनवेल तालुक्यात १० गावे व ८ वाड्यांसाठी ९ टँकरद्वारे १८ हजार ५५३ नागरिकांना पाणीपुरवठा केला जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT