पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील तीव्र पाणीटंचाईवर तोडगा काढण्यासाठी रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री भरतशेठ गोगावले यांच्या दालनात सोमवारी विशेष बैठकीचे आयोजन Pudhari
रायगड

Panvel Water Crisis | पनवेलच्या पाणीप्रश्नी पालकमंत्र्यांची विशेष बैठक; आमदार विक्रांत पाटील आक्रमक

न्हावाशेवा टप्पा तीनचे काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी; एमआयडीसीकडून १० एमएलडी वाढीव पाणी देण्याचा आग्रह

पुढारी वृत्तसेवा

Panvel Water Supply Issue

पनवेल : पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील तीव्र पाणीटंचाईवर तोडगा काढण्यासाठी रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री भरतशेठ गोगावले यांच्या दालनात सोमवारी विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत आमदार विक्रांत पाटील यांनी पनवेलच्या पाणीप्रश्नी आक्रमक भूमिका घेत रखडलेल्या जलवाहिनी प्रकल्पांची कामे तातडीने पूर्ण करण्यासह अतिरिक्त पाणी उपलब्ध करून देण्याच्या मागण्या केल्या. न्हावाशेवा टप्पा क्रमांक तीनचे काम त्वरित पूर्ण करावे, एमआयडीसीकडून १० एमएलडी वाढीव पाणी द्यावे आणि मोरबे धरणातील खासगी विकासकासाठीचे पाणी आरक्षण रद्द करावे, अशा प्रमुख मागण्या त्यांनी मांडल्या.

या बैठकीला खासदार श्रीरंग बारणे, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार विक्रांत पाटील, महापौर नितीन पाटील, महापालिका आयुक्त मंगेश चितळे यांच्यासह महापालिका, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (एमजेपी), एमआयडीसी आणि सिडकोचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी पनवेल महापालिका क्षेत्रातील विविध प्रभाग आणि सिडकोच्या वसाहतींना होणारा पाणीपुरवठा, प्रत्यक्ष उपलब्ध पाण्याचे प्रमाण तसेच मागणी आणि पुरवठ्यातील तफावत यांचा आढावा घेण्यात आला.

आमदार विक्रांत पाटील यांनी न्हावाशेवा टप्पा क्रमांक तीनच्या रखडलेल्या कामाचा मुद्दा उपस्थित केला. या योजनेचे काम विलंबाने सुरू असल्यामुळे पनवेलच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. हा टप्पा लवकरात लवकर कार्यान्वित करण्यासाठी एमजेपीच्या अधिकाऱ्यांना आवश्यक आदेश देण्याची मागणी त्यांनी पालकमंत्र्यांकडे केली. तसेच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत पनवेलच्या पाणीप्रश्नी स्वतंत्र बैठक घेण्याची मागणीही केली.

मोरबे धरणातील आरक्षण रद्द करण्याची मागणी

पनवेल तालुक्यातील मोरबे धरणातील खासगी विकासकासाठी राखीव ठेवलेले पाणी आरक्षण रद्द करून ते पनवेल शहरासाठी उपलब्ध करून द्यावे. यामुळे शहराला सुमारे १० एमएलडी पाणी मिळू शकते, अशी भूमिका आमदार पाटील यांनी मांडली. याशिवाय एमआयडीसीकडून आणखी १० एमएलडी वाढीव पाणी उपलब्ध करून देण्याची मागणी केली.

दरम्यान, जीर्ण पाइपलाइन आणि प्रलंबित कामांबाबत एमजेपीच्या कार्यपद्धतीवर त्यांनी नाराजी व्यक्त केली. पाइपलाइनशी संबंधित उर्वरित कामे पुढील तीन महिन्यांत पूर्ण करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना देण्याची मागणी करत त्यांनी कामातील दिरंगाईबद्दल जाब विचारला.

या बैठकीला नगरसेवक रामदास शेवाळे, अरविंद म्हात्रे, ॲड. प्रथमेश सोमण, कळंबोली शिवसेना शहराध्यक्ष तुकाराम सरक यांच्यासह जलसंपदा विभाग, सिडको, एमजेपी आणि एमआयडीसीचे अधिकारी उपस्थित होते. पनवेलकरांची पाणीटंचाई दूर करण्यासाठी तातडीच्या उपाययोजनांसह दीर्घकालीन जलनियोजनावरही बैठकीत चर्चा करण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT