खांदा कॉलनी: पनवेलमधील वडाळे सरोवर परिसरात मुसळधार पावसामुळे पुन्हा मोठ्या प्रमाणावर गवत वाढले आहे. सरोवराच्या परिसरात सर्वत्र गवताचे साम्राज्य पसरल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
वडाळे सरोवराचे रूपांतर ‘गवताळ प्रदेशात’ झाले की काय, असा प्रश्न पनवेलकरांकडून उपस्थित केला जात आहे. पावसामुळे सरोवराच्या काठावर तसेच पाण्याच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर गवत वाढले आहे. त्यामुळे सरोवराचे नैसर्गिक सौंदर्य झाकोळले जात आहे.
सरोवर परिसरात नियमित स्वच्छता आणि देखभाल करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. गवत वाढल्यामुळे सरोवरातील जैवविविधतेवरही परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
तसेच वाढलेल्या गवतामुळे डास आणि कीटकांचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे. परिसरातील नागरिक आणि सकाळी फिरण्यासाठी येणाऱ्यांना याचा त्रास होत आहे. नागरिकांच्या तक्रारींची दखल घेत पालिकेने सरोवरातील गवत काढण्यास सुरुवात केली आहे.
पालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून सरोवर परिसरातील वाढलेले गवत हटविण्याचे काम सुरू आहे. गवताची नियमित छाटणी आणि साफसफाई करण्याची गरज निर्माण झाली आहे. पावसाळ्यात गवताची वाढ झपाट्याने होत असल्याने पालिकेने विशेष लक्ष देण्याची मागणी आहे.
सरोवर परिसर स्वच्छ आणि सुशोभित ठेवण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गरज नागरिकांनी व्यक्त केली. केवळ तात्पुरती साफसफाई न करता नियमित देखभाल करण्याची अपेक्षा पनवेलकरांकडून व्यक्त होत आहे.
साफसफाई मोहिमेमुळे नागरिकांना काहीसा दिलासा
वडाळे सरोवर हे शहरातील महत्त्वाचे नैसर्गिक ठिकाण असल्याने त्याचे जतन आवश्यक आहे. सरोवरातील गवत, जलपर्णी आणि कचऱ्यावर नियमित नियंत्रण ठेवण्याची मागणी होत आहे. पालिकेच्या साफसफाई मोहिमेमुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र पावसाळा संपेपर्यंत अशीच नियमित मोहीम राबविण्याची गरज आहे. वडाळे सरोवर पुन्हा निसर्गरम्य आणि स्वच्छ दिसावे, अशी अपेक्षा पनवेलकर व्यक्त करीत आहेत.