पनवेल : विक्रम बाबर
पनवेल महानगरपालिकेची निवडणूक प्रक्रिया सुरू असतानाच प्रभाग क्रमांक २ मधील अंतिम मतदार यादीत उघड झालेल्या धक्कादायक घोळामुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे. एका व्यक्तीच्या नावाखाली तब्बल २६८ मुलांची नोंद आढळून आल्याचा प्रकार समोर आल्यानंतर, या प्रकरणाला आता गंभीर वळण मिळाले असून शेतकरी कामगार पक्षाचे माजी नगरसेवक अरविंद म्हात्रे यांनी थेट उच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली आहे.
महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांना नुकतीच अंतिम मतदार यादी उपलब्ध करून देण्यात आली. त्याच दरम्यान ही धक्कादायक बाब उघडकीस आली. एका वडिलांच्या नावाखाली असामान्य संख्येने मुलांची नोंद आढळल्याने मतदार यादीच्या विश्वासार्हतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
या संदर्भात उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत अरविंद म्हात्रे यांनी नमूद केले आहे की, या २६८ नावांपैकी बहुसंख्य तरुण हे उत्तर प्रदेश व मध्य प्रदेशातील असून, संबंधित व्यक्ती प्रत्यक्षात पनवेलमध्ये वास्तव्यास नाहीत. तरीही त्यांची नावे एकाच पत्त्यावर मतदार म्हणून नोंदवण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.
हा प्रकार केवळ प्रशासकीय चूक नसून, आगामी पनवेल महानगरपालिका निवडणुकीवर प्रभाव टाकण्यासाठी जाणीवपूर्वक करण्यात आलेला गंभीर गैरप्रकार असल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे. “एका वडिलांना २६८ मुले दाखवणे म्हणजे मतदार यादीची थट्टा असून लोकशाही प्रक्रियेचा थेट अपमान आहे. बाहेरील लोकांची नावे मतदार यादीत घालून निवडणुकीत गैरव्यवहार करण्याचा हा प्रयत्न आहे,” असे स्पष्ट मत अरविंद म्हात्रे यांनी व्यक्त केले आहे.
याचिकेद्वारे त्यांनी उच्च न्यायालयाकडे संबंधित मतदार यादीची तातडीने सखोल आणि निष्पक्ष चौकशी करण्याचे आदेश द्यावेत, बनावट व संशयास्पद नोंदी तत्काळ रद्द कराव्यात, तसेच या प्रकरणास जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर व संबंधितांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी केली आहे.
दरम्यान, पनवेल महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक १४ मधील अंतिम मतदारयादीतून पूर्वश्रीत १४०० मतदाराची नावे वगळण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. निवडणुकीच्या तोंडावरच असा प्रकार उघडकीस आल्याने पनवेलमध्ये राजकीय वातावरण तापले असून, मतदार यादीसारख्या महत्त्वाच्या प्रक्रियेवर प्रशासनाचा कितपत ताबा आहे, याबाबत नागरिकांमध्ये तीव्र चर्चा सुरू आहे. लोकशाहीचा पाया मानल्या जाणाऱ्या मतदार यादीतच अशा स्वरूपाचा घोळ आढळणे ही अत्यंत गंभीर बाब असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.
आता पनवेल महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उच्च न्यायालय या प्रकरणात काय भूमिका घेते, चौकशीचे आदेश दिले जातात का आणि दोषींवर कारवाई होते का, याकडे संपूर्ण पनवेलचे लक्ष लागले आहे.