विक्रम बाबर
पनवेल : शहरातील वाहनधारकांना ‘एचएसआरपी नंबर प्लेट लावा, अन्यथा दंडाला सामोरे जा’, असे आवाहन पनवेल वाहतूक पोलिसांकडून सातत्याने केले जाते. मात्र, हाच नियम अंमलात आणणाऱ्या पोलिसांच्याच वाहनातून त्याची पायमल्ली होत असल्याचे समोर आले आहे. पनवेल वाहतूक शाखेच्या ताफ्यातील टोईंग व्हॅन ही रस्त्यावर HSRP प्लेटविना सर्रास धावत असल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले आहे.
परिवहन विभागाच्या नियमानुसार, सर्व वाहनांवर HSRP प्लेट अनिवार्य असून व्यावसायिक अथवा अधिकृत वाहनांसाठी तर हा नियम अधिक कठोरपणे लागू मानला जातो. वाहन चोरी प्रतिबंध, ओळख पटविणे आणि वाहतूक नियंत्रणासाठी ही प्लेट अत्यावश्यक आहे. अशा परिस्थितीत टोईंग व्हॅनलाच HSRP नसणे हा गंभीर प्रकार असल्याची चर्चा शहरात जोर धरत आहे.
नवीन पनवेल परिसरात ही टोईंग व्हॅन दिवसा ढवळ्या फिरताना दिसते. याच वाहनाच्या मदतीने वाहतूक पोलिस इतर वाहनांवर HSRP नसल्याबद्दल कारवाई करतात. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड संभ्रम निर्माण झाला आहे. ‘जे नियम पाळू नयेत त्यांच्यावर कारवाई केली जाते, परंतु पोलिसांचेच वाहन नियमभंग करत असेल तर त्या वाहनावर कारवाई कोण करणार?’ असा प्रश्न नागरिकांमधून जोरदारपणे विचारला जात आहे.
काही स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे, ‘वाहतूक पोलिस एक सांगतात आणि स्वतः वेगळेच करतात. अधिकृत वाहनावर HSRP नसेल तर सामान्य नागरिकांकडून नियमपालनाची अपेक्षा कशी ठेवायची?’ अशा स्वरूपाची टीका समाजमाध्यमांतही वाढू लागली आहे.
दरम्यान, राज्य परिवहन विभागाने सर्व वाहनधारकांना तत्काळ HSRP बसवण्याचे आवाहन पुन्हा एकदा केले आहे. HSRP नसल्यास दंड किंवा पुढील कारवाईची तरतूद असल्याचेही विभागाने स्पष्ट केले. नियमांचे पालन केल्यास वाहन ओळख, सुरक्षितता आणि संपूर्ण वाहतूक व्यवस्था अधिक सुस्थितीत राहते, असेही आवाहनात नमूद करण्यात आले आहे.