

रायगड : पनवेल तालुक्यांतील वरचे ओवळे, करंगडे, पुष्पक नगर येथील निवासी क्षेत्रात गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने होणाऱ्या दगड कोसळण्याच्या घटनांमुळे येथील स्थानिक नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला होता. नागरिकांच्या जीविताचा धोका लक्षात घेऊन सन 2024 मध्ये सिडकोने अखेर अर्ली वॉर्निंग सिस्टीमसह जाळ्या लावून रॉकफॉल संरक्षणाची कामे सुरू केली. मात्र पावसाळ्यात हे काम ठप्प झाले. ती तत्काळ पूर्ण करण्याची मागणी येथील रहिवाशांनी केली आहे.
ठेकेदाराने अर्ली वॉर्निंग सिस्टीमची उभारणी तसेच आवश्यक नेटिंगचे काम सिडकोच्या सूचनांनुसार मार्च 2025 मध्ये पूर्ण केले.तथापि, काही अत्यंत धोकादायक पट्टे सिडकोने संरक्षित न करता अपूर्णच ठेवले, ज्यामुळे स्थानिकांचे जीवन आणि मालमत्ता सतत धोक्यात असल्याची तक्रार स्थानिकांची आहे.
एप्रिल 2025 मध्ये मान्सून 2025 पूर्वी सर्व उर्वरित कामे पूर्ण करण्याचे आश्वासन सिडकोने दिले होते.पण आता मान्सून संपला तरी नोव्हेंबर उजाडला तरी उर्वरित कामाला सुरुवात देखील केलेली नाही. या भागातून जाणारा रस्ता थेट असुरक्षित कड्याखाली असल्यामुळे नागरिकांना रोज आपला जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो.पावसाळ्यात अनेकदा दगड कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत विशेषतः मुलांसाठी हा धोका अधिक गंभीर असल्याचे स्थानिकांचे म्हणणे असून त्यांनी तक्रारी देखील केल्या आहेत.
सोमवारी साईट व्हिजीट करुन अपूर्ण कामे पूर्ण करण्याकरिता लवकरच सुरुवात करण्यात येईल.
योगेश गोसावी, अभियंता, सिडको