Panvel heatwave Pudhari
रायगड

Panvel heatwave: पनवेल शहरामध्ये मे महिन्यातच उघडल्या छत्र्या; कडक उन्हामुळे नागरिक हैराण

तापमान 36 अंश सेल्सिअसवर; सिमेंट काँक्रीटचे रस्तेही तापले

पुढारी वृत्तसेवा

पनवेल: पनवेल आणि परिसरामध्ये दिवसेंदिवस तापमानाचा पारा वाढत चालल्याने सर्वसामान्य नागरिक प्रचंड हैराण झाले आहेत. यंदा मे महिन्यातच उन्हाळ्याने अत्यंत विक्रमी आणि तीव्र रूप धारण केले असून, दुपारच्या वेळी रस्त्यांवर उष्णतेची तीव्रता अधिक जाणवू लागली आहे.

उन्हाचा तडाखा इतका असह्य झाला आहे की, नागरिकांना भर उन्हात स्वतःचा बचाव करण्यासाठी आतापासूनच थेट पावसाळ्यात वापरल्या जाणाऱ्या छत्र्यांचा आधार घ्यावा लागत आहे.

विशेषतः शहरातील मुख्य रस्ते आणि महामार्गांवरून प्रवास करणारे दुचाकीस्वार उन्हापासून संरक्षण करण्यासाठी चक्क छत्री घेऊन प्रवास करताना दिसत आहेत. दुपारच्या वेळेत नागरिक ठिकठिकाणी सावलीचा आश्रय शोधत असून, कडक उन्हामुळे बाजारपेठा आणि रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळत आहे.आर्द्रतेमुळे हवेत प्रत्यक्ष तापमान 32 ते 36 अंश असले तरी नागरिकांना तब्बल 40 अंश इतक्या तीव्र उष्णतेची जाणीव होत आहे.

हवेतील आर्द्रता 64 टक्के ते 68 टक्के होती. या उच्च आर्द्रतेमुळे उकाड्यात कमालीची वाढ झाली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आगामी रविवार (17 मे) आणि सोमवारी (18 मे) देखील पनवेलमधील कमाल तापमान 36 वरच कायम राहण्याची शक्यता आहे. रविवारी दुपारच्या वेळी विनाकारण बाहेर पडणे टाळावे, भरपूर पाणी प्यावे आणि उन्हापासून संरक्षणासाठी छत्री, टोपी व सुती कपड्यांचा वापर करावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

रायगड जिल्ह्यातील अनेक शहरी भागात दुपारच्या वेळेत अतिशय तीव्र उन्हाळा सहन करावा लागत आहे. दिवसेंदिवस कमी होणारे वृक्षांचे अच्छादन आणि वाढणारे सिमेंटचे जंगल यामुळे तापमान अधिक जाणवत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT