

रायगड: राज्यात खळबळ उडवून देणाऱ्या भोंदू अशोक खरात विरोधात तक्रार दाखल करण्याच्या घटनेला आज (17 मे) दोन महिने पूर्ण झाले आहे. या प्रकरणानंतर दोनच महिन्यात पोलिसांनी राज्यात 35 भोंदू बाबांविरोधात गुन्हे दाखल होऊन त्यांचे दरबार उधळून लावला आहे.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने गुन्ह्यांचे संकलन केले असल्याची माहिती राज्य कार्याध्यक्ष संजय बनसोडे, बुवाबाजी संघर्ष विभागाच्या कार्यवाह ॲड. रंजना गवांदे ,सहकार्यवाह विष्णूदास लोणार आणि राज्य पदाधिकारी नितीन राऊत यांनी दिली आहे.
नाशिक येथे घडलेल्या भोंदू अशोक खरातच्या प्रकरणानंतर दोन महिन्यात राज्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात गुन्हे दाखल होणे ही पुरोगामी महाराष्ट्राला चिंतेत टाकणारी व विचार करायला लावणारी ही घटना आहे.काही ठिकाणी उत्स्फूर्त तर काही ठिकाणी अंनिसच्या प्रयत्नाने हे गुन्हे दाखल झाले आहे.
या यादीवरून असे लक्षात येते की बहुतांश सर्वच धर्मातील भोंदू बाबा विरोधात गुन्हे दाखल झाले आहे. त्यामुळे अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम केवळ हिंदू धर्मातच केले जाते , या सनातनी आरोपाला पुन्हा एकदा सणसणीत उत्तर मिळाले आहे. भोंदू बाबांनी ग्रामीण भागासह व शहरी भागातील महिला व पुरुष यांची फसवणूक केल्याचे या घटनांवरून उघड झाले आहे.
विशेषता यात महिलांवरील शारीरिक शोषणासह आर्थिक लुटीचे प्रमाण अधिक आहे. भीतीपोटी व सामाजिक प्रतिष्टेपोटी अनेक पीडित समोर येण्यास घाबरत आहे,खरात प्रकरणानंतर पीडित महिलांना लढण्याची हिंमत निर्माण झाली आहे.त्यांना न्यायाची अपेक्षा पण निर्माण झाली आहे. इतरही आणखी पीडितांनी पुढे येण्याची गरज निर्माण झाली आहे.
यातील बहुतेक प्रकरणात महिलांचे लैंगिक शोषण झाल्याचे समोर आले आहे.पुरोगामी महाराष्ट्रात भोंदूंचे पेव किती फुटले आहे, याची राज्यभर चर्चा चालू आहे.अंधश्रद्धेमुळे समाजातील फसवणूक रोखण्यासाठी शहीद डॉ नरेंद्र दाभोलकर यांच्या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने 18 वर्ष लढा दिला. या संघर्षा नंतर 2013 मध्ये ‘महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा व त्याचे समूळ उच्चाटन अधिनियम 2013’ हा कायदा अस्तित्वात आला. असा कायदा बनविणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले होते.
या कायद्याची प्रभावी अंबलबजवणी करण्यात सरकार अयशस्वी ठरले असले तरी अंनिस मर्यादा व क्षमता याचा विचार करता,आपल्या पातळीवर त्याचे प्रबोधन, प्रचार, प्रसार करत आहे.त्यामुळे अनेक ठिकाणी गुन्हे दाखल होत आहे. हे गुन्हे जादूटोणा विरोधी कायदा किंवा इतर कायद्याच्या कलमाखाली दाखल झालेले आहेत.
अंधश्रद्धेमुळे समाजातील फसवणूक रोखण्यासाठी शहीद डॉ नरेंद्र दाभोलकर यांच्या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने 18 वर्ष लढा दिला. या संघर्षा नंतर 2013 मध्ये ‘महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा व त्याचे समूळ उच्चाटन अधिनियम 2013’ हा कायदा अस्तित्वात आला.
दाखल झालेल्या गुन्ह्यावरून असे स्पष्ट होते की ग्रामीण भागासोबतच शहरी भागात भोंदूगिरीचे प्रकार समोर आले आहे. बहुतांश सर्वच धर्मात गुन्हे दाखल झाल्याने हिंदू धर्मातच अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम होते ,हा काहींचा दावा फोल ठरला आहे
-संजय बनसोडे, राज्य कार्याध्यक्ष, अंनिस