पनवेल : शाळा आणि महाविद्यालयांना लक्ष्य करणारा चोरटा.  pudhari photo
रायगड

Panvel School Theft : घरफोडीचा वेगळाच फंडा; शाळा-कॉलेज लुटणारा चोरटा जेरबंद

कळंबोली पोलिसांची कारवाई; १.७६ लाखांची रोकड जप्त

पुढारी वृत्तसेवा

पनवेल : शाळा आणि महाविद्यालयांनाच लक्ष्य करून चोरी व घरफोडी करणाऱ्या ६५ वर्षीय सराईत चोरट्याला कळंबोली पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक तपासाच्या आधारे अटक केली आहे. शेखर सेरप्पा पुजारी ( रा. खार, मुंबई) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून १ लाख ७६ हजार ७७० रुपयांची रोकड तसेच घरफोडीसाठी वापरले जाणारे साहित्य जप्त करण्यात आले आहे.

कळंबोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत सेक्टर १४ येथे असणाऱ्या एमईएस पब्लिक स्कूलमध्ये ११ ऑगस्टच्या मध्यरात्री चोरी झाल्याची घटना १२ ऑगस्ट रोजी सकाळी उघड झाली. चोरट्याने ऑफिसच्या खिडकीचे ग्रील कापून आत प्रवेश केला आणि शाळेच्या ऑफिसमध्ये जमा असलेली १ लाख ७६,७७० रुपयांची रोख रक्कम चोरट्याने पळवली. या घटनेची माहिती मिळताच कळंबोली पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक तानाजी नारनवर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन शिंदे, हवालदार सचिन पवार, हवालदार आबु जाधव, निलेश सोळुंके व शरद मराठे यांच्या पथकाने आरोपीचा शोध सुरू केला. या गुन्ह्याच्या तपासादरम्यान पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले.

त्याचबरोबर तांत्रिक तपासाच्या माध्यमातून आरोपीचा माग काढण्यात आला. त्यानंतर शेखर पुजारी याला खार, मुंबई येथून ताब्यात घेऊन अटक केली. त्याच्याकडून जवळपास १ लाख ७६,७७० रुपयांची रोकड तसेच चोरी करण्यासाठी वापरलेले साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे.

पोलिसांच्या तपासात आरोपीची चोरी करण्याची पद्धत विशेष असल्याचे समोर आले आहे. सर्वसामान्य घरांना लक्ष्य करण्याऐवजी आरोपी शाळा आणि महाविद्यालयांमध्येच चोरी व घरफोडी करत असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यामुळे नवी मुंबई परिसरातील शैक्षणिक संस्थांमध्ये यापूर्वी झालेल्या चोरीच्या घटनांशी या आरोपीचा संबंध आहे का, याचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.

अनेक जिल्ह्यांत गुन्ह्यांची नोंद

शेखर पुजारी हा शाळा व महाविद्यालयांमधील चोरी आणि घरफोडीच्या गुन्ह्यांसाठी पोलिसांच्या रेकॉर्डवर असल्याचे समोर आले आहे. त्याच्याविरुद्ध कोल्हापूर, सातारा, इचलकरंजी, कल्याण, पुणे, मुंबई व नवी मुंबई परिसरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. कळंबोली पोलिसांनी नवी मुंबई परिसरातील शाळा किंवा महाविद्यालयांत चोरी अथवा घरफोडी झालेल्या संस्थांनी कळंबोली पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT