Heavy Rain Update
पनवेल : पनवेल महापालिका क्षेत्रात गेल्या दोन दिवसापासून जोरदार पर्जन्यवृष्टी होत असून भारतीय हवामान विभागाने 19 ऑगस्ट रोजी देखील रायगड जिल्ह्याला रेड अलर्ट दिला असून मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. सोमवारी पहाटेपासूनच पनवेल महापालिका कार्यक्षेत्रात मुसळधार पाऊसास सुरूवात झाली. या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासन अलर्ट मोडवर असून पाणी साठणाऱ्या भागावरती अधिक लक्ष केंद्रीत केले आहे. तसेच सर्व यंत्रणेला सुसज्ज व सतर्क राहण्याचे आदेश तर नागरिकांनी स्वतःची काळजी घ्यावी असे आवाहन आयुक्त मंगेश चितळे यांनी केले आहे.
दरम्यान पनवेल मधील बांठिया शाळेजवळ मोठ्या प्रमाणात पाणी साठले असून आयुक्त मंगेश चितळे व परिवहन व्यवस्थापक कैलास गावडे यांनी याठिकाणी प्रत्यक्ष जाऊन पाहाणी केली. याच बरोबर कळंबोलीमध्येही प्रत्यक्ष जाऊन पहाणी केली. तर उपायुक्त रवीकिरण घोडके, प्रभारी अधिक्षक रोशन माळी यांनी प्रभाग क्रमांक 17 पनवेलमध्ये नदी काठची पाहणी केली. कळंबोली मधील 20 ठिकाणी 20 एचपी पंपाच्या माध्यमातून काढण्यात येत असून याठिकाणी कोठेही पाणी साठणार याची काळजी महापालिकेच्यावतीने घेण्यात येत आहे. उपायुक्त रवीकिरण घोडके, उपायुक्त अभिषेक पराडकर व सहायक आयुक्त सुबोध ठाणेकर व प्रभाग अधिक्षक दशरथ भंडारी यांच्या देखरेखीखाली पनवेल शहरातील कोळीवाडा भारत नगर झोपडपट्टी, पटेल मोहल्ला मधील ८० नागरिकांना कोळीवाडा शाळेमध्ये स्थलांतरीत करण्यात आले आहे. तसेच कोळीवाड्यातील १०५ नागरिकांना उर्दु प्राथमिक शाळा येथे स्थलांतरीत करण्यात आले आहे.
या ठिकाणी चहा ,जेवण, आरोग्य सेवा व पाण्याची सोय पनवेल महानगरपालिका तर्फे करण्यात येणार आहे. तसेच वैद्यकिय आरोग्य विभागाच्यावतीने मदत सुरू करण्यात आली आहे. हवामान खात्याने मंगळवारी देखील रायगड जिल्ह्याला अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी महापालिकेच्यावतीने सर्व तयारी करण्यात आली आहे. आपत्कालीन परिस्थितीत मदत यंत्रणा सज्ज ठेवण्यात आल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त कैलास गावडे यांनी दिली आहे.
सध्या गाढी नदी इशारा पातळी 6 मी एवढी असून सध्या पाण्याची पातळी 3.75 मीटर आहे.चारही प्रभागातील प्रभाग अधिकाऱ्यांना त्या त्या विभागातील अद्ययावत माहिती देण्याविषयी आयुक्तांनी सूचित केले आहे. कळंबोली मध्ये भरपूर पाणी साठते, त्यामुळे कळंबोली मधील पाणी उपसा करणारे डिझेल व इलेक्ट्रिक पंप सातत्याने सुरु ठेवण्याच्या सूचना प्रभाग अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. तसेच पनवेल मध्ये गाढी नदीच्या पाणी पातळीवर देखील लक्ष ठेऊन याबाबतची माहिती देण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या आहेत.
मुसळधार पाऊसात नागरिकांनी धोकादायक इमारतीमध्ये आसरा घेऊनये तसेच झाडे होर्डिंग्ज खाली उभारू नये असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे. नागरिकांची सुरक्षितता व काळजी घेण्यासाठी महापालिका तत्पर असून कोणत्याही परिस्थितीत नागरिकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन आयुक्त मंगेश चितळे यांनी केले आहे. महापालिकेच्या सर्व विभागांनी आयुक्तांच्या निर्देशानुसार आपापसात योग्य समन्वय ठेवून "अलर्ट मोड' वर काम करावे, योग्य नियोजन करून उपाययोजना कराव्यात, अशा सूचना अतिरिक्त आयुक्त व उपायुक्तांनी महापालिकेच्या सर्व संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
रोहा तालुक्यातील कुंडलिका नदीने धोकाची पातळी ओलांडली, शहरातील काही रस्त्यांवर पाणी, भुवनेश्वर येथे ही काही ठिकाणी पाणी...
गेली चार दिवस रोहा शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात पाऊस पडत असताना सोमवारी मात्र पावसाने सातत्य ठेवत दिवसभर मुसळधार पाऊस पडला आहे. त्यामुळे तालुक्यातील नदी नाले तुंडुब भरून वाहत आहेत. सकाळी शाळेत जाणारे विद्यार्थी व कंपनीत कामाला जाणारे कामगारांना त्याचा फटका बसण्याचे दिसून आले. दिवसभर पाऊस पडत असल्याने सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. संपूर्ण वातावरण काळोखमय व पाऊसमय झाल्याचे दिसून आले.
रात्रभर पाऊस पडल्यानंतर सोमवारी सकाळी सुद्धा मुसळधार पडला आहे. त्यामुळे कुंडलिका नदी तुडुंब म्हणून वाहत होती. नदीकाठच्या गावांना शासनाने सतर्कचा इशारा दिला आहे. कुंडलिका नदीने धोक्याची पातळी ओलांडल्यानंतर नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात पाणी आले होते. या नदीच्या वर असलेल्या जुन्या पुलावरून पाणी जात असल्याने कुंडलिका नदीवरील रोहा अष्टमीला जोडणाऱ्या जुन्या पुलावरून वाहतूक बंद आले होते.
रोह्यात सकाळपासूनच मुसळधार पाऊस पडत असल्याने रोहा तालुक्यातील कुंडलिका पातळी ओलांडली होती. सोमवारी सर्वत्र पाऊस पडत आहे. रायगड जिल्ह्यातील कुंडलिका नदीने इशारा पातळी ओलांडले आहे. कुंडलिका नदी तुडुंब भरून वाहत होती. रोहा तालुक्यात सकाळपासूनच मुसळधार पाऊस पडत असल्याने रोहा शहरातील दमखाडी नाका, कोर्ट रोड, नाना शंकर शेठ रोड वर पाणी आले होते. अष्टमी नाकावर पाणी आल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत होता. अष्टमीच्या पलीकडे जाणाऱ्या नागरिकांना गुडघ्यावर पाण्यातून जावे लागत होते. रोहा नजीक असलेल्या भुवनेश्वर गावातही काही ठिकाणी पाणी आल्याचे दिसून आले. मुंबई गोवा महामार्गावरील आंबेवाडी नाक्यावर सुद्धा पाणी आल्याने आंबेवाडी नाक्यावरील दुकानात पाणी शिरल्याचे चित्र दिसून येत आहे.
वाशिम नगर परिषदेचे मुख्याधिकारी अजय कुमार एडके यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपरिषद चे कर्मचारी रोहा अष्टमी शहरात व अष्टमी पुलाच्या दोन्ही बाजूला तैनात ठेवण्यात आले होते. नगरपरिषदेचेवतीने सायरन वाजून नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला होता. रोहा पोलीस निरीक्षक मारुती पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली रोहा पोलिसांची टीम सुद्धा सज्ज होती.