

पनवेल : पनवेलच्या महागणपतीचा शामियाना उभारणीला सुरुवात झाली असून बांबू आणि ताडपत्रीच्या पारंपरिक शेडएवजी यावर्षी जर्मन टेकनॉलॉजीचा वापर करून शेडउभारणी सुरू झाली आहे. यासाठी मध्य प्रदेशातील इंदूर येथून साहित्य मागविण्यात आले आहे. हा शामियाना सात हजार चौरस स्केअर फुटांचा असतो.
आकर्षक राजवाडा, भव्यता, विद्युत रोषणाई आणि सुबक शिवाय तितकीच बोलकी गणेशमूर्ती ही पनवेलच्या महागणपतीचे आकर्षण असते. रायगड आणि नवी मुंबईसह कोकण व महाराष्ट्रातही या गणपतीची चर्चा असते.
एक ते दिड महिना अधीपासूनच मंडळाचे शामियाना उभारणीचे काम सुरू होते. यावर्षी जर्मन पद्धतीने मंडप उभारण्यात येणार येत आहे. ही पद्धत महागडी असली तरी सुटसुटीत आणि कमी वेळेत पूर्ण होणारी आहे. याचे हँगर अल्युमिनियमचे असून ते खास मध्य प्रदेशातील इंदूर येथून मागविण्यात आले आहेत.
पनवेल शहरातील गुजराती शाळा मैदान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग व डॉ. पटवर्धन हॉस्पिटल समोरील मैदानावर ही मंडप उभारणी सुरू आहे. पूर्णतः फायबर , लोखंड तसेच लाकडी काम असलेला भव्य राजवाडा उभारला जात आहे. एक, दोन दिवसात आतील सजावटीच्या कामास प्रारंभ होणार आहे.
2012 कांतीलाल प्रतिष्ठानने पनवेलचा महागणपती हा सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला आहे. कोणत्याही स्पर्धेत सहभागी न होता भक्ती-शक्तीचे जागरण येथे श्रद्धेने केले जाते. या मंडळाला नवी मुंबई पोलिस आयुक्तालयाकडूनही गौरविण्यात आले आहे.
एक भव्यदिव्य राजवाडा, आकर्षक प्रवेशद्वार (एन्ट्री व एक्सिटसाठी दोन वेगळ्या मार्गिका), मध्यभागी सभागृह, गणपतीचा विशेष गाभारा आणि भाविकांप्रमाणेच विशेष अतिथींसाठी मध्यभागी प्रवेशद्वार असणार आहे. पाहुण्यांची विशेष आसन व्यवस्था, सांस्कृतिक कार्यक्रमाचा रंगमंच, रसिकांसाठी आसनव्यवस्था करण्यात येत आहे. यंदाचा भव्य राजवाडा संच दिवंगत कला दिग्दर्शक नितीन देसाई यांचे एकेकाळचे सहाय्यक असलेले कलदिग्दर्शकांची कंपनी उभारत आहे.