पनवेल : पनवेल शहरातील एका बालगृहातून पाच मुलींनी एकाच वेळी पलायन केल्याची धक्कादायक घटना रविवारी घडल्याचे समोर आले आहे. या घटनेची माहिती पनवेल शहर पोलिसांना मिळताच पोलिसांनी तत्काळ मुलीचा शोध सुरू केल्या नंतर पाच पैकी तीन मुलींचा शोध लागला असून या मुली सुखरूप असल्याचे पनवेल शहर पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. बालगृहात रहायचे नाही म्हणून या मुली पळून गेल्याची माहिती मुलींनी पोलिसांना दिल्याचे समोर येत आहे.
पनवेल शहरातील तक्का वसाहती मध्ये असलेल्या बालगृहातून पाच मुली पळून गेल्याची माहिती, बालगृहाचे व्यवस्थापक यांनी पनवेल शहर पोलिसांना रविवारी सकाळी आठ वाजता फोन करून दिली. सकाळी ही माहिती मिळाल्या नंतर पनवेल शहर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीन ठाकरे यांनी या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून या मुलीचा तपास सुरू केला. पोलिसांनी बालगृहातील व्यवस्थापना कडून मुलीच्या नातेवाईकांची माहिती घेतली. तसेच मुंबई उपनगरातील रेल्वे पोलिसांना या घटनेची माहिती देऊन तपास सुरू केला.
नातेवाईकाकडे चौकशी केल्यानंतर पोलीसांच्या अथक प्रयत्ना नंतर तीन मुली पोलिसांना मिळून आल्या. त्या पैकी एक मुलगी ही उरण येथील चिरनेर तिच्या गावात सापडली. तर दुसरी मुलगी ही बांद्रा रेल्वे स्थानकात सापडली. तिच्या सोबत कोण नसल्याने तिला डोंगरी येथील बालगृहात ठेवण्यात आले. तर तिसरी मुलगी ही सातारा येथील तिच्या मूळ गावी असल्याचे पोलिसांना माहिती मिळाल्या नंतर सातारा पोलिसांच्या मदतीने तिला सातारा येथील बालगृहात ठेवण्यात आले आहे. तर अन्य दोन मुलीचा शोध पनवेल शहर पोलिस घेत आहे.