Navratri Festival Pudhari
रायगड

Panvel Navratri Festival: घटस्थापनेपूर्वी मूर्तिकारांकडून देवीच्या मूर्तींना अंतिम साज; नवरात्रोत्सवाचा उत्साह शिगेला

खांदा वसाहतीसह पनवेल परिसरात देवीच्या आगमनाची लगबग; सार्वजनिक नवरात्र मंडळांची तयारी पूर्णत्वाकडे

पुढारी वृत्तसेवा

खांदा कॉलनी: नवरात्रोत्सव उद्या असल्याने खांदा वसाहतीसह पनवेल परिसरात देवीच्या आगमनाची लगबग सुरू झाली आहे. घटस्थापनेच्या पार्श्वभूमीवर विविध मूर्तिकारांकडून देवीच्या मूर्तींना अंतिम रूप देण्याचे काम सुरू आहे.

नऊ दिवस चालणाऱ्या नवरात्रोत्सवात आदिशक्तीचा जागर होणार असून, त्यासाठी सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळांची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. मूर्तिकारही आपल्या कल्पकतेतून देवीचे आकर्षक रूप साकारण्यात मग्न आहेत.

देवीच्या चेहऱ्यावरील भाव, डोळ्यांची रेखीव मांडणी, रंगसंगती, वस्त्रालंकार आणि मुकुटाची सजावट याकडे विशेष लक्ष दिले जात आहे. प्रत्येक मूर्तिकार आपल्या कल्पनेनुसार देवीचे रूप अधिक देखणे आणि भक्तिमय करण्याचा प्रयत्न करत आहे.

मूर्तीच्या सजावटीतील प्रत्येक बारकावा जपताना मूर्तिकारांचा कस लागत आहे. अखेरचा रंग, अलंकारांची मांडणी आणि सुबक सजावट पूर्ण करण्यासाठी कारागिरांची दिवसरात्र धावपळ सुरू आहे.

दरम्यान, मंडळांकडूनही मंडप उभारणी, विद्युत रोषणाई आणि सजावटीची कामे वेगाने सुरू आहेत. घटस्थापनेच्या दिवशी लाडक्या देवीचे आगमन होणार असल्याने भाविकांमध्ये उत्सुकता वाढली आहे. खांदा वसाहत आणि पनवेल परिसरात नवरात्रोत्सवाचा उत्साह आता शिगेला पोहोचला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT