panvel municipal corporation Pudhari
रायगड

Panvel News: पनवेल मनपाची पहिली महासभा पाण्याने सापडली वादात; योग्य कार्यवाहीचे आदेश

महापौर नितीन पाटील यांच्याकडून परिस्थितीचा आढावा

पुढारी वृत्तसेवा

पनवेल: पनवेल महानगरपालिकेचे महापौर नितीन पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी ( 1 एप्रिल) झालेली पहिली आणि पालिकेची तिसरी महासभा ही पाण्याच्या हंडा मोर्चाने वादळी ठरली, पाणी पुरवठा नियमित करावा अशी मागणी महाविकास आघाडीच्या नेत्या सह स्थानिक महिला रहिवाशांनी हातात हंडा घेऊन केली. या मधील काही मोर्चे करी महिला थेट हंडा घेऊन सभेच्या हॉलमध्ये बसलेल्या दिसून आल्याने, पाणी टंचाइच्या मुद्देने लक्ष वेधले .

यावेळी मंचावर उपमहापौर प्रमिला पाटील, आयुक्त मंगेश चितळे, अतिरीक्त आयुक्त गणेश शेटे, महापालिका सचिव नानासाहेब कामठे उपस्थित होते.तर सभागृहात सभागृह नेते,विविध समित्यांचे सभापती, विरोधी पक्ष नेत्यांचा सर्व महापालिका सदस्य उपस्थित होते.

वैद्यकीय अधिकारी शरद वसंतराव पाटील, गट-अ, यांच्या नियुक्तीस सर्वसाधारण सभेची मान्यता मिळण्याचा विषय यावेळी मंजूर करण्यात आला. महानगरपालिकेच्या 02 डायलॅसीस युनिटमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांसाठी वापरण्यात येणाऱ्या मेडिकल गॅस सिलेंडरचे कंत्राटी तत्वावर मेडिकल गॅस रिफलिंग करुन घेणेकरिता एजन्सीची नेमणुक करण्याकरिता निविदा प्रक्रिया राबविणे व त्याकरिता येणाऱ्या खर्चास आर्थिक व प्रशासकीय मान्यता मिळणेबाबचा विषयांवर चर्चा करून विषय मंजूर करण्यात आला.

पनवेल महानगरपालिका हद्दीतील प्रभाग समिती “ड“ मधील विविध ठिकाणी असलेल्या पनवेल महानगरपालिका मालकीच्या सर्व सार्वजनिक शौचालयांची आवश्यकतेनुसार दोन वर्षासाठी दुरुस्ती व नुतनीकरण करणे या कामाच्या प्रस्तावास प्रशासकीय व आर्थिक मान्यता मिळणे बाबतच्या विषय मंजूर करण्यात आला.

पनवेल महानगरपालिका क्षेत्रात आपत्कालीन परिस्थितीत व पावसाळ्यापूर्वी नाले साफसफाई करण्याच्या विषयावर चर्चा करण्यात आली व एक वर्षासाठी या विषयास मंजूरी देण्यात आली.

प्रशासन पूर्णतः पारदर्शी

या सर्वसाधारण सभांमध्ये विषय पत्रिकेवरील मुद्द्यांना उत्तर देताना आयुक्त मंगेश चितळे यांनी सविस्तरपणे व समर्पकपणे प्रशासनामार्फत केलेल्या कामकाजाची माहिती दिली. एकूणच प्रशासन पूर्णतः पारदर्शक असल्याचे त्यांनी सांगितले.पनवेल महानगर पालिकेमार्फत प्रशासक कालावधीत केलेल्या विविध उपक्रमांची सविस्तर माहिती स्वतंत्र पेनड्राईव्ह मध्ये सर्व सन्माननीय नगरसेवकांना देण्यात आली आहे.

कदाचित राज्यातील हा पहिला प्रयोग असावा.महानगरपालिकेत प्रशासक कार्यकाल सुरू झाल्यापासून ते प्रशासक कार्यकाल संपेपर्यंत जे काही निर्णय घेतले, उपक्रम राबविले त्याची संपूर्ण माहिती सर्व सन्माननीय नगरसेवकांना देण्यात आली आहे.

पनवेल महानगरपालिका कार्यक्षेत्रातील नागरिकांच्या सर्वांगीण सुविधेसाठी प्रशासन सातत्याने कार्यरत आहे. यात प्रामुख्याने आरोग्य, शिक्षण, पर्यावरण, नागरी सुरक्षा, पाणीपुरवठा, स्वच्छता, घनकचरा व्यवस्थापन तसेच ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, महिला व बालकल्याण विषयक संदर्भात सर्व अनुषंगिक बाबींसाठी अत्यंत जागरूकतेने प्रशासनाने काम केलेले आहे. त्याची सर्व सविस्तर माहिती, लेखाजोखा देण्यात आलेला आहे.

पाणीसमस्येवर विशेष बैठक

प्रश्नोत्तरांच्या तासांमध्ये महापालिका क्षेत्रातील चारही प्रभागातील पाणी पुरवठा समस्येवर चर्चा करण्यात आली. न्हावा शेवा पाणी योजना, अतिरिक्त टँकर मागणी, याबाबत आयुक्त मंगेश चितळे यांनी यावेळी माहिती दिली. तसेच याबाबत चर्चा करण्यासाठी विशेष बैठक घेण्याविषयी महापौर नितीन पाटील यांनी निर्देश दिले.

आयुक्तांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे 150 दिवसांच्या प्रशासकीय सुधारणा कार्यक्रमांतर्गत पनवेल महानगरपालिकेने उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल सन्मानित करण्यात आल्याबद्दल आजच्या महासभेत महापालिका सदस्यांनी आयुक्त मंगेश चितळे यांचा अभिनंदनाचा प्रस्ताव मांडण्यात आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT