

अलिबाग, मुरुडः मुरुड सार्वजनिक बांधकाम खात्यामध्ये कनिष्ठ अभियंता या पदावर काम करणाऱ्या श्रद्धा दिलीप बोऱ्हाडे यांना अडीच लाखांची लाच घेताना लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडले आहे.
एका ठेकेदाराने मुरुड शहराजवळ असणाऱ्या एकदर, राजपुरी, खोकरी येथील गावातील रस्त्यालगत स्लॅब ड्रेनचे काम पूर्ण केले होते.
हे काम पूर्ण झाल्यावर झालेल्या कामाचे पूर्ण बिल अंदाजपत्रक सह तयार करून देण्याकरिता कनिष्ठ अभियंता श्रद्धा बोऱ्हाडे यांनी तक्रारदार यांच्याकडून सर्व प्रथम तीन लाख मागितले. तद्नंतर तडजोड होऊन अडीच लाख रुपये देण्याचे ठरवण्यात आले. या बाबत तक्रारदार यांनी अलिबाग येथील लाच लुचपत अधिकारी यांच्याकडे तक्रार नोंदवली होती.
तक्रारीची शहनिशा केल्यानंतर अलिबाग रायगड लाचलुचपत अधिकारी यांनी सापळा रचला. मुरुड येथील सार्वजनिक बांधकाम कार्यालयात दोन लाख पन्नास हजार रुपयांची तक्रारदार यांच्याकडून लाच स्वीकारताना त्यांना रंगेहात पकडण्यात आले.