पनवेल ः विक्रम बाबर
पनवेल महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकांचे निकाल जाहीर होताच शहराच्या राजकारणात एक नवे पर्व सुरू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. भारतीय जनता पक्षाने 5 लाख 37 हजार 331 मते मिळवत एक नंबरचा पक्ष ठरण्याचा मान पटकावला असला, तरी खरी राजकीय चर्चा आणि विश्लेषण उभे राहिले आहे ते उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या दमदार कामगिरीमुळे. तब्बल 1 लाख 25 हजार 992 मते मिळवत तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. ही कामगिरी केवळ आकड्यांपुरती मर्यादित न राहता पनवेलच्या भविष्यातील राजकीय समीकरणांवर दूरगामी परिणाम करणारी ठरणार आहे.
या निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाने 1 लाख 78 हजार 345 मते मिळवत दुसरा क्रमांक राखला आहे. मात्र नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीशी तुलना केली असता चित्र अधिक ठळकपणे समोर येते. विधानसभा निवडणुकीत शेकाप आणि उबाठा गटाच्या उमेदवार वेगवेगळे निवडणुकीला सामोरे गेले होते, त्यावेळी शेकापला सव्वालाखाच्या आसपास मते मिळाली होती, तर उबाठाच्या उमेदवाराला केवळ 43 हजार मतांवर समाधान मानावे लागले होते. त्याच पनवेलमध्ये काही महिन्यांतच उबाठाने जवळपास तिप्पट मते मिळवत राजकीय पुनरागमन केले आहे. ही वाढ आकस्मिक नसून, ती मतदारांच्या मानसिकतेतील बदल दर्शवणारी आहे.
या निकालांमुळे सर्वाधिक आव्हान निर्माण झाले आहे ते शेतकरी कामगार पक्षापुढे. अनेक दशकांपासून पनवेल परिसरात मजबूत पकड असलेल्या शेकापला यावेळी दुसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले असले, तरी उबाठाची झपाट्याने वाढलेली मते भविष्यातील निवडणुकांसाठी इशाराच मानली जात आहे. परंपरागत शेकाप मतदारांचा एक भाग उबाठाकडे वळल्याची चर्चा असून, ही मतांतरणाची प्रक्रिया पुढील निवडणुकांत अधिक तीव्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
भाजपने स्पष्ट बहुमतासह आपले वर्चस्व कायम ठेवले असले, तरी विरोधी राजकारण अधिक धारदार आणि त्रिकोणी होत असल्याचे संकेत या निकालांतून मिळतात. पूर्वी भाजप विरुद्ध शेकाप अशी सरळ लढत दिसत होती, मात्र आता उबाठाच्या उदयानंतर ही लढत त्रिकोणी स्वरूप धारण करत आहे. याचा परिणाम आगामी विधानसभा, लोकसभा तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर निश्चितच होणार आहे.
उबाठाला मिळालेल्या मतांनी पनवेलमध्ये नवी राजकीय समीकरणे आकार घेत आहेत. युवा मतदार, शहरी मध्यमवर्ग आणि असंतुष्ट मतदारांचा एक वर्ग उबाठाकडे आकर्षित होत असल्याचे या निकालांतून स्पष्ट होते. हा वर्ग भविष्यात ‘किंगमेकर’ ठरण्याचीही दाट शक्यता आहे. त्यामुळे यापुढे पनवेलमधील कोणतीही राजकीय रणनीती आखताना उबाठाला दुर्लक्षित करणे कोणत्याही पक्षाला परवडणारे ठरणार नाही.
स्थानिक संघटनेची एकजूट
पनवेलच्या राजकारणात उबाठा गट गेल्या काही काळापासून लुप्त झाल्यासारखा वाटत होता. पक्षातील फूट, कार्यकर्त्यांचे विखुरलेपण आणि संघटनात्मक मरगळ याचा थेट परिणाम निवडणूक निकालांवर दिसत होता. मात्र या महापालिका निवडणुकीत जिल्हा प्रमुख शिरीष घरत यांच्या नेतृत्वाखाली उबाठाने केवळ अस्तित्व टिकवले नाही, तर स्वतःची स्वतंत्र राजकीय जागा पुन्हा निर्माण केली आहे. हे यश केवळ भावनिक सहानुभूतीवर आधारित नसून, स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांचे संघटन, प्रचारातील आक्रमकता आणि मतदारांशी थेट संवाद याचे फलित असल्याचे राजकीय जाणकार सांगतात.