पनवेल : विक्रम बाबर
पनवेल महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज आरक्षण सोडत जाहीर झाली असून, या सोडतीनंतर अनेक विद्यमान नगरसेवकांच्या राजकीय आकांक्षांवर पाणी फिरले आहे. आरक्षणात झालेल्या बदलांमुळे शहरात आणि पक्षांतर्गत गटांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले असून, प्रभाग निहाय नवे राजकीय समीकरण तयार होण्यास सुरुवात झाली आहे.
पनवेल, कामोठे आणि कळंबोली या तिन्ही शहरांतील काही प्रभागांच्या आरक्षणात झालेल्या बदलांमुळे अनेकांच्या इच्छा आणि योजना धुळीस मिळाल्या आहेत. विशेषतः पनवेल शहरातील प्रभाग क्रमांक 18 हा सर्वांच्या चर्चेचा विषय ठरत आहे. या प्रभागाचे विद्यमान आणि माजी नगरसेवक विक्रांत पाटील यांची विधानपरिषदेवर आमदार म्हणून निवड झाल्यानंतर त्यांच्या जागेवर कोण उमेदवारी लढणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यांच्या जागेवर त्यांच्या पत्नी किंवा बहिणींपैकी एक जण निवडणूक रिंगणात उतरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, याच प्रभागातून शेकापच्या तिकिटावर निवडून आलेले माजी नगरसेवक प्रीतम म्हात्रे यांनी काही महिन्यांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केल्याने, या प्रभागातील राजकारणाला नवे वळण मिळाले आहे. प्रीतम म्हात्रे यंदा स्वतः निवडणूक लढवतील की त्यांच्या पत्नींना संधी देतील, याबाबत प्रभागात चर्चेचा विषय रंगला आहे. त्या सोबत शेकापचे माजी नगरसेवक नितीन पाटील यांचं प्रभागातील.असल्याने, त्यांना यंदा उमेदवारी मिळणार का अशी आशा, त्याच्या कार्यकर्त्यां मध्ये निर्माण झाली आहे. त्यामुळे हा ‘हाय व्होल्टेज’ प्रभाग म्हणून ओळखला जात असून, येत्या काही दिवसांत येथे मोठे राजकीय बदल होणार हे निश्चित झाले आहे.
दरम्यान, कामोठे परिसरातील प्रभाग क्रमांक 11 मध्ये झालेल्या आरक्षण बदलांमुळे यंदा येथे दोन पुरुष आणि एक महिला उमेदवार निवडणूक लढवताना दिसतील. या बदलामुळे विद्यमान महिला नगरसेविकांचे पती यंदा निवडणूक रिंगणात उतरतील, अशी चर्चा स्थानिक राजकीय वर्तुळात रंगली आहे. तर दुसरीकडे, नवीन पनवेल, खांदा कॉलनी, खारघर, कळंबोली आणि तळोजा या शहरांतील प्रभागांमध्ये आरक्षणात फारसा बदल झाला नसल्याने, या भागातील विद्यमान नगरसेवक पुन्हा एकदा मैदानात उतरतील, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
पनवेल महानगरपालिकेच्या आरक्षण सोडतीनंतर शहरातील राजकीय चित्र पूर्णपणे बदलले आहे. काहींच्या राजकीय आकांक्षा मावळल्या असल्या तरी, नवीन चेहऱ्यांना संधी मिळण्याची दारे उघडली आहेत. आता आरक्षणानंतर पक्षनिहाय उमेदवारी ठरविण्याची चुरस सुरू होणार असून, पनवेलच्या आगामी निवडणुकीला रंग चढू लागला आहे.
प्रभाग 20 मध्ये दोन महिलांना संधी
प्रभाग क्रमांक 20 मध्ये देखील आरक्षण सोडतीत झालेल्या बदलांमुळे स्थानिक राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली आहेत. हा त्रिसदस्यीय प्रभाग असून, यंदा येथे दोन ‘सर्वसाधारण महिला’ आरक्षण लागल्याने विद्यमान पुरुष नगरसेवकांच्या उमेदवारीच्या आशा धुळीस मिळाल्या आहेत.
माजी महापौर-उपमहापौर यांच्या प्रभागात आरक्षण
पनवेल महानगरपालिकेच्या आरक्षण सोडतीत प्रभाग क्रमांक 16 हा सर्वाधिक चर्चेत आलेला प्रभाग ठरला आहे. हा प्रभाग माजी महापौर कविता चौतमल आणि उपमहापौर यांचा मानला जातो. मागील निवडणुकीत याच प्रभागातून अनुसूचित जाती (महिला) या आरक्षणातून कविता चौतमल निवडून आल्या होत्या आणि नंतर त्यांनी महापौरपद भूषवले होते.
यंदाच्या आरक्षण सोडतीनुसार प्रभाग क्रमांक 16 (अ) ना, मा , प्र ( महिला ) (ब) सर्वसाधारण (महिला), (क) सर्वसाधारण, आणि (ड) सर्वसाधारण असे आरक्षण जाहीर झाले आहे. त्यामुळे विद्यमान महापौर कविता चौतमल यांना यंदा आपल्या जागेवरून पुन्हा निवडणूक लढविता येईल का, या प्रश्नाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राजकीय वर्तुळात या बदलामुळे मोठी खळबळ उडाली असून, या प्रभागातील आगामी निवडणूक अधिक रंगतदार होण्याची चिन्हे दिसत आहेत.