खारघर ः पनवेल महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप व महायुतीला रोखण्यासाठी महाविकास आघाडीतील जागावाटपाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. घटकपक्षांतील मतभेद बाजूला ठेवत एकसंघ लढत देण्यावर भर देण्यात येत असून, यासाठी आघाडीतील प्रमुख पक्षांनी तडजोडीची भूमिका स्वीकारल्याचे स्पष्ट झाले आहे. पनवेलमध्ये महाविकास आघाडीचे ठरले, अशा आशयाच्या पोस्ट समाजमाध्यमांवर झळकू लागल्याने राजकीय हालचालींना वेग आला आहे.
पनवेल महापालिकेत भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी प्रत्येक प्रभागात एकच सर्वमान्य उमेदवार देण्यावर आघाडीने ठाम भूमिका घेतली आहे. प्रत्येक प्रभागातील मतांचे विभाजन टाळण्यासाठी इच्छुकांची मनजुळवणी, संवाद आणि समन्वयाचा मार्ग स्वीकारण्यात येत असल्याचे आघाडीतील नेत्यांकडून सांगण्यात येत आहे.
पाच प्रभागांचा तिढा कायम
पनवेल महापालिका क्षेत्रातील प्रभाग 1 ते 3 (ग्रामीण तळोजा) आणि प्रभाग 7 व 8 (रोडपाली व कळंबोली) यामध्ये अद्याप उमेदवारांवर एकमत होताना दिसत नाही. आघाडीतील इतर पक्ष प्रभाग 8 मध्ये राष्ट्रवादीच्या यापूर्वी निवडून आलेल्या माजी नगरसेवकाला स्थानिक विकास आघाडीशी जुळवून घेण्यास सांगत आहेत. मात्र या प्रस्तावाला माजी नगरसेवकाचा सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही. या प्रभागात आघाडीच्या मतांचे विभाजन होऊ नये यासाठी चर्चा केली. येत्या दोन दिवसात उमेदवारांची अंतिम यादी जाहीर केली जाणारआहे.
शेकाप 38, उर्वरित पक्ष 40 जागा
चार दिवसांपूर्वी महाविकास आघाडीच्या नेतेमंडळींची बैठक पार पडली. बैठकीनंतर आघाडीतील सर्वात मोठा घटक असलेल्या शेतकरी कामगार पक्षाने त्यागाची भूमिका घेतली. मागील 2017 च्या निवडणुकीत लढवलेल्या जागांपेक्षा यंदा तब्बल 18 जागा कमी ठेवत शेकापने 38 जागांवर उमेदवार देण्यास होकार दिला आहे.उर्वरित 40 जागांचे वाटप ठाकरे गटाची शिवसेना, शरद पवार गटाची राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, रिपब्लिकन चळवळीतील सहकारी पक्ष, समाजवादी पक्ष तसेच खारघर फोरम व कळंबोलीतील विकास आघाडी यांच्यात करण्यात येणार आहे.
हा त्याग सत्तेसाठी नव्हे, तर एकसंघपणे जिंकण्यासाठी आहे. लढू आणि जिंकू, या तत्त्वावर आधारित ही रणनिती पनवेलमध्ये महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशी थेट लढत उभी करणार आहे. या निर्णयामुळे शेकापमधील काही इच्छुकांमध्ये नक्कीच नाराजी असली तरी, पक्षपातळीवर समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.बाळाराम पाटील, माजी आमदार