पनवेल (रायगड) : पनवेल महानगरपालिकेच्या सन २०२५ मधील सार्वत्रिक निवडणुकांसाठीची तयारी प्रशासनाने सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर प्रभाग रचनेच्या भूगोलिक सीमांची अधिसूचना जाहीर करण्यात आली असून नागरिकांच्या हरकती व सूचना मागविण्यात आल्या आहेत.
निवडणुकीपूर्वी प्रभागांची भौगोलिक सीमा निश्चित करणे हा महत्वाचा टप्पा मानला जातो. या अनुषंगाने पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त मंगेश चितळे यांच्या आदेशा नुसार दि. ३ सप्टेंबर २०२५ रोजी अधिसूचना प्रसिद्ध करण्यात येणार आहे. नागरिकांना आपापल्या हरकती व सूचना लेखी स्वरूपात आयुक्त कार्यालयात अथवा संबंधित प्रभाग कार्यालयांमध्ये सादर करता येणार आहेत.
हरकती व सूचना दाखल करण्यासाठी ३ सप्टेंबरपासून १५ सप्टेंबर २०२५ पर्यंतची मुदत देण्यात आली आहे. दुपारी ३ वाजेपर्यंत नागरिकांना आपले अर्ज सादर करता येतील. विशेष बाब म्हणजे हरकती व सूचना दाखल करणाऱ्या नागरिकांना सुनावणीसाठी स्वतंत्रपणे उपस्थित राहण्याची संधी दिली जाणार आहे.
पनवेल महानगरपालिका स्थापनेपासून ही दुसरी २०२५ मध्ये सार्वत्रिक निवडणुका होत असून, त्यामुळे शहरातील राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे आहेत. प्रभाग रचना, आरक्षण, मतदारसंख्या आदी घटक निश्चित झाल्यानंतर आगामी निवडणुकांच्या चित्राला स्पष्टता येणार आहे.
नगरसेवकपदाच्या इच्छुकांसाठी ही अधिसूचना महत्त्वाची ठरणार असून, विविध भागातील नागरिकही आपल्या परिसराचा प्रभाग कोणत्या सीमांतर्गत येतो, याकडे लक्ष ठेवून आहेत. पुढील काही दिवसांत यासंदर्भात नागरिकांच्या हरकती व सूचना मोठ्या प्रमाणात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकीची तयारी औपचारिकपणे सुरू झाल्याने आता स्थानिक राजकीय पक्ष व इच्छुक उमेदवारही सक्रिय होण्याची चिन्हे दिसत आहेत.