पनवेल (रायगड) : कामोठे शहरातील मानसरोवर रेल्वे स्थानकाकडे जाणारा मुख्य मार्ग पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे. Pudhari News Network
रायगड

Panvel Municipal Corporation News: डांबरीकरणानंतर चार दिवसांतच रस्त्या खोदला

कामोठेतील नागरिकांचा संताप; पालिकेचा ढिसाळ कारभार पुन्हा चर्चेत

पुढारी वृत्तसेवा

पनवेल (रायगड) : कामोठे शहरातील मानसरोवर रेल्वे स्थानकाकडे जाणारा मुख्य मार्ग पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे. नुकताच डांबरीकरण करून टकाटक करण्यात आलेला हा रस्ता अवघ्या चार दिवसांतच पुन्हा खोदण्यात आल्याने नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे. पनवेल महानगरपालिकेचा हा ढिसाळ आणि बेफिकीर कारभार पुन्हा एकदा उघड झाला आहे.

गेल्या काही महिन्यांपासून हा मुख्य मार्ग अक्षरशः खड्ड्यांनी व्यापलेला होता. त्यामुळे वाहनचालकांना व पादचाऱ्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते. अनेक वेळा नागरिकांनी सामाजिक माध्यमांवरून आणि थेट पालिकेकडे तक्रारी करून या रस्त्याची दुरवस्था मांडली होती. शेवटी नागरिकांच्या संतप्त प्रतिक्रियांमुळे पालिका जागी झाली आणि काही आठवड्यांपूर्वी कोट्यवधी रुपयांचा खर्च करून या मार्गावर डांबरीकरण करण्यात आले.

डांबरीकरणानंतर काही दिवस तरी रस्ता सुरळीत राहील अशी अपेक्षा होती; पण पालिकेच्या निष्काळजी कारभारामुळे ही आशा फोल ठरली. डांबरीकरण झाल्याला चारच दिवस झाले असताना पुन्हा या रस्त्यावर खोदकाम सुरू करण्यात आले आहे. सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यासाठी ठेकेदारामार्फत हे काम चालू असून या खोदकामामुळे रस्त्याचा पुन्हा बोजवारा उडाला आहे.

पालिका प्रशासनाकडून कामांचे नियोजन आणि समन्वयाचा पूर्ण अभाव असल्याचे या घटनेवरून स्पष्ट होते. एका विभागाने डांबरीकरण करून घेतल्यावर दुसऱ्याच विभागाकडून खोदकाम सुरू होणे हे प्रशासनातील संवादाअभावी होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

रस्त्यावर पुन्हा खड्डे

नुकतेच टाकलेले डांबर उखडल्यामुळे रस्त्यावर पुन्हा खड्डे निर्माण झाले आहेत. त्यामुळे वाहनचालकांची गैरसोय वाढली आहे एका बाजूला खड्डे बुजवण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जातो आणि दुसऱ्याच आठवड्यात खोदकाम करून तो खर्च अक्षरशः वाया घालवला जातो, अशी टीका स्थानिक नागरिक करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT