Panvel Municipality Re-recruitment : पनवेल पालिकेत पुन्हा भरती प्रक्रिया

134 रिक्त पदांसाठी नव्याने परीक्षा
Panvel Municipality
Panvel Municipality Pudhari News Network
Published on
Updated on

पनवेल : पनवेल महापालिकेतील १३४ रिक्त पदांसाठी लवकरच पुन्हा भरती प्रक्रिया राबविण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. सप्टेंबर महिन्यात शासनाकडे भरती प्रक्रियेला मुदतवाढ मिळावी, यासाठी महापालिकेने पाठविलेला प्रस्ताव तांत्रिक कारणामुळे मागे घेण्यात आला असून आता पुन्हा टीसीएस कंपनीमार्फत नव्याने भरती प्रक्रिया सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

पनवेल महानगरपालिकेमध्ये १३४ पदे रिक्त असल्याने प्रशासनाने या पदांसाठी नव्याने भरती प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या पनवेल महापालिकेत एकूण १३२६ कर्मचारी कार्यरत आहेत. यापैकी ८२५ जण महापालिका आस्थापनातील अधिकारी आणि कर्मचारी असून ६७ जण हे शिक्षक आहेत.

२०२३ साली टीसीएस कंपनीमार्फत ३७७पदांची भरती प्रक्रिया पूर्ण झाली होती. मात्र काही उमेदवारांनी इतर संस्थांमध्ये रुजू झाल्याने १३४ पदे पुन्हा रिक्त राहिली. सप्टेंबर महिन्यात महापालिकेने शासनाकडे या भरती प्रक्रियेला मुदतवाढ देण्यासाठी प्रस्ताव पाठविला होता. मात्र, तांत्रिक कारणामुळे तो प्रस्ताव अमान्य ठरण्याची शक्यता निर्माण झाल्याने महापालिकेने तो प्रस्ताव मागे घेतला आहे. परिणामी प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना संधी मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले असून, आता या पदांसाठी पुन्हा परीक्षा घेऊन भरती प्रक्रिया पार पडणार आहे. महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक मंगेश चितळे यांनी सामान्य प्रशासन विभागाला निर्देश दिले असून, नव्याने प्रक्रिया राबविण्यासाठी टीसीएस कंपनीकडून लागणाऱ्या खर्चाचा सविस्तर तपशील मागविण्यात आला आहे. या हालचालीमुळे महापालिकेतील सुमारे १३४ पदांच्या भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे.

या पार्श्वभूमीवर नव्या भरती प्रक्रियेच्या तयारीला वेग आला असून, लवकरच पनवेल महापालिकेकडून जाहिरात प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे. यामुळे स्थानिक तरुणांसाठी पुन्हा एकदा रोजगाराची नवी संधी उपलब्ध होणार आहे. या रिक्त पदांपैकी सर्वाधिक म्हणजे ७६ पदे ही लिपिक-टंकलेखक या संवर्गातील आहेत. त्याशिवाय कनिष्ठ अभियंता (स्थापत्य, विद्युत, हार्डवेअर-नेटवर्किंग), वैद्यकीय अधिकारी, हिवताप अधिकारी, परिचारिका, अग्निशमन दलातील कर्मचारी, वाहनचालक, माळी, सहाय्यक क्रीडा अधिकारी, तसेच विविध लघुलेखक पदेही रिक्त आहेत.

पनवेल महापालिकेने ३७७ पदांसाठी सरळ सेवेमार्फत परीक्षा घेतली त्या काळात राज्य सरकारच्या विविध परीक्षा सुरू होत्या, अनेक उमेदवारानी इतर विभागांच्या भरती प्रक्रियेतही सहभाग घेतल्याने काहींची निवड एकापेक्षा अधिक ठिकाणी झाली, त्यापैकी अनेकांनी आपल्या राहत्या परिसराच्या जवळील नोकरीला प्राधान्य दिल्यामुळे पनवेल महापालिकेतील निवड झाल्यानंतर त्यांनी रुजू होणे टाळले. त्यामुळे आयुक्तांच्या निर्देशानुसार आता रिक्त पदासाठी पुनश्च भरती प्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

कैलास गावडे, उपायुक्त, पनवेल महापालिका

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news