Panvel heavy rainfall pudhari photo
रायगड

Panvel heavy rainfall : जोरदार पावसात पालिकेचा जागता पहारा

पनवेल महापालिकेची यंत्रणा २४ तास सज्ज, सर्व प्रभागातील सखल भागांवर विशेष लक्ष

पुढारी वृत्तसेवा

पनवेल : पनवेल महानगरपालिका क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेची संपूर्ण यंत्रणा सतर्क ठेवण्यात आली असून आपत्ती व्यवस्थापन, अग्निशमन, अभियांत्रिकी, पाणीपुरवठा, आरोग्य, घनकचरा व्यवस्थापन आणि प्रभाग कार्यालयांतील अधिकारी व कर्मचारी २४ तास फिल्डवर कार्यरत आहेत.

महापालिका महापौर नितीन पाटील व आयुक्त मंगेश चितळे यांच्या निर्देशानुसार सखल भाग, पाणी साचणारी ठिकाणे, नाले तसेच पूरप्रवण परिसरावर विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे. ज्या ठिकाणी पाणी साचल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत, त्या ठिकाणी तत्काळ पथके पाठवून पाण्याचा निचरा करण्यात येत असून आवश्यकतेनुसार पंपाच्या साहाय्याने पाणी उपसण्याचे काम सुरू आहे. दरम्यान गाढी नदीच्या पुलाच्या खाली अडकलेली जलपर्णी काढण्याचे काम चालू असून नदीपात्रातील पाण्याचा प्रवाह चालू झाला आहे.

भारतीय हवामान विभागाने पुढील दोन दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तविल्याने महापालिकेने सर्व यंत्रणा सज्ज ठेवली आहे.रविवारी पावसाच्या पाण्याने बाधित झालेल्या सुमारे 435 नागरिकांचे चार तात्पुरत्या निवारा केंद्रांमध्ये सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात आले असून त्यांना चहा, नाश्ता, जेवण, पिण्याचे पाणी तसेच अन्य आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

नागरिकांनी अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, सखल भाग, नाले, ओढे, खाडी परिसर तसेच पाणी साचलेल्या रस्त्यांवरून प्रवास करताना विशेष दक्षता घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. महापालिकेने नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवता केवळ अधिकृत सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले असून कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तात्काळ पनवेल महानगरपालिकेच्या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधवा आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रमुख कैलास गावडे यांनी सांगितले आहे.

महापौरांकडून पाहणी

महापौर नितीन पाटील व स्थायी समिती सदस्य परेश ठाकूर यांनी गाढी नदी पात्राची पहाणी केली तसेच पोदी २ येथील एका घरावर झाड पडण्याची दुर्घटना घडली. या ठिकाणची प्रत्यक्ष पहाणी केली यावेळी महापालिका सदस्य अजय बहिरा, गणेश कडू, महापालिका अधिकारी उपस्थित होते.

आपत्ती व्यवस्थापन सज्ज

आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षामार्फत परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत असून अग्निशमन विभाग, आरोग्य विभाग आणि इतर संबंधित यंत्रणांमध्ये समन्वय साधून तातडीने कार्यवाही केली जात आहे. कार्य क्षेत्रात झाडे पडण्याच्या अनेक घटना नोंदविण्यात आल्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT