दीपक घोसाळकर
कळंबोली ः भाजपा मध्ये झालेले विविध पक्षातील इनकमिंग आणि विकासाच्या प्रमुख मुद्द्यावर भाजप स्वतंत्रच लढण्याच्या मनस्थितीत असल्याचे खाजगीरित्या बोलले जात आहे.थोड्याच दिवसांमध्ये भाजप स्वबळावर लढणार की शिंदे सेने सोबत युती करणार हे चित्र स्पष्ट होईल. मात्र मागील निवडणुकीप्रमाणेच भाजप तितक्याच ताकतीने पनवेल महापालिकेची सत्ता खेचण्याच्या तयारीमध्येच असल्याचे दिसून येत आहे.
आचारसंहिते पूर्वीच मोठ्या विकास कामांच्या भूमिपूजनाचा आणि लोकार्पणाचा कार्यक्रम घाई गडबडीत का होईना हा आचारसंहिते पूर्वी आणि आचारसंहितास लागण्याची घोषणा करत असतानाच केला गेला असल्याचे दिसून आले आहे. मागील निवडणुकीत भाजप शेकाप आणि राष्ट्रवादी यांचेच नगरसेवक हे निवडून आले होते.यावेळी भाजप स्वबळावर लढणार की युती करणार हे मात्र अद्याप चित्र स्पष्ट झालेले नाही. परंतु भाजप 65 जागांवर निवडणुका भाजपचेच उमेदवार लढवणार असल्याचे यापूर्वीच सूचित केलेले आहे.त्यामुळे उर्वरित जागांवरच युतीच्या पक्षांना समाधान मानावे लागणार आहे. परंतु ते कितपत योग्य ठरेल हे आगामी काळच ठरवणार आहे.
भाजपचा अजेंडा हा विकासाचा मुद्द्यावर असणार आहे. त्यांनी त्या पद्धतीत पनवेल महानगर क्षेत्राच्या विविध प्रभागांमधून विकासाचा जी गंगा आणली गेली आहे ती निश्चितच मतदारांना प्रभावित करणारी अशीच आहे. त्यामुळे त्याचा फायदा निश्चितच भाजपला होणार असल्याचे दिसून येत आहे.तरीसुद्धा भाजपच्या विरोधामध्ये असणारे राष्ट्रवादी शरद पवार गट,उबाटा शिवसेना गट, मनसे आणि काँग्रेस या पक्षांची मोट कशा पद्धतीने मांडली जात आहे याकडेच आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वीच आणि लागल्यानंतरही विविध राजकीय पक्षांनी आपल्या जनसंपर्क कार्यालयांच्या उद्घानाचा धडाकाही तितकाच सुरू केलेला आहे. विविध प्रभागांमध्ये विविध सेक्टरमध्ये विविध राजकीय पक्ष आपले जनसंकल्प जनसंपर्क कार्यालय उद्घाटन करून निवडणुकीची गरमागरम हवा सुरू केल्याचे चित्र एकंदरीत दिसून येत आहे. निवडणुकीची घोषणा कधी होते यासाठी विविध राजकीय पक्ष चातका पक्ष्याप्रमाणे वाट पाहत होते कारण दररोज कार्यकर्त्यांना सांभाळणे ही सुद्धा एक तारेवरची कसरत राजकीय पक्षांच्या नेते मंडळींना करावी लागत होती. आता निवडणुकीची प्रतीक्षा संपली असून निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर राजकीय पक्षांच्या नेतेमंडळी आणि कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.