खांदा कॉलनी : दिव्यांग बांधवांना सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आणि मतदानाच्या दिवशी त्यांना मतदान केंद्रांवर ये-जा करणे सोयीचे व्हावे, या उद्देशाने पनवेल महानगरपालिकेने सुमारे दोन वर्षांपूर्वी खरेदी केलेल्या ६४० सायकलींची सध्या दुरवस्था झाली आहे. लाखो रुपये खर्च करून खरेदी केलेल्या या सायकलींचा योग्य वापर होण्याऐवजी त्या धूळखात पडून असल्याचे समोर आले आहे. काही सायकली गंजलेल्या, तर काही तुटलेल्या अवस्थेत असल्याने महापालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, निवडणुकीच्या काळात दिव्यांग मतदारांच्या सुविधेसाठी या सायकली खरेदी करण्यात आल्या होत्या. त्यापैकी सुमारे ३०० सायकली मतदान केंद्रांवर उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. मात्र, मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर काही सायकली पुन्हा पालिकेकडे परत आल्याच नसल्याची माहिती पुढे येत आहे. उर्वरित सायकलींची योग्य देखभाल न झाल्याने त्यांची अवस्था बिकट झाली आहे. एका सायकलीची किंमत अंदाजे पाच हजार रुपये असल्यास ६४० सायकलींसाठी सुमारे ३२ लाख रुपयांचा खर्च झाल्याचा अंदाज आहे.
दरम्यान, पालिकेकडे सायकली ठेवण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध नसल्याने त्या कामोठे येथील सरकारी कार्यालयाच्या गच्चीवर ठेवण्यात आल्याची माहिती पालिकेचे भांडार प्रमुख प्रकाश गायकवाड यांनी दिली. दोन वर्षांपूर्वी निवडणुकीच्या कामासाठी दिव्यांग मतदारांच्या सुविधेसाठी या सायकली खरेदी करण्यात आल्या होत्या, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मात्र, या सायकलींची सद्यस्थिती पाहता त्यांच्या देखभालीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. किती सायकली प्रत्यक्षात मतदान केंद्रांवर वापरण्यात आल्या? किती सायकली परत जमा झाल्या? किती सायकलींची दुरुस्ती होऊ शकते? तसेच त्यासाठी पुन्हा किती खर्च करावा लागणार? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. दिव्यांगांच्या सुविधेसाठी खरेदी केलेले साहित्य गरजू लाभार्थ्यांपर्यंत पोहोचले का, याचीही तपासणी होणे आवश्यक आहे.
दिव्यांगांच्या मदतीसाठी खरेदी केलेल्या सायकलींची अशी अवस्था होत असेल, तर सार्वजनिक पैशांचा विनियोग नेमका कशासाठी झाला, असा सवाल उपस्थित होत आहे. आता आयुक्त या प्रकरणाची चौकशी करून जबाबदारी निश्चित करणार का आणि धूळखात पडलेल्या सायकली पुन्हा वापरात आणणार का, याकडे पनवेलकरांचे लक्ष लागले आहे.
आयुक्तांकडे तक्रार; १५ दिवसांचा अल्टिमेटम
या प्रकरणी पनवेल येथील सुरेश खरात यांनी महापालिका आयुक्तांकडे लेखी तक्रार केली आहे. आरोग्य विभागाने दिव्यांगांसाठी खरेदी केलेल्या सायकली आणि व्हीलचेअरच्या खरेदीचा तपशील, एकूण संख्या, त्यासाठी झालेला खर्च तसेच प्रत्यक्ष लाभार्थ्यांना वाटप केलेल्या साहित्याची यादी जाहीर करण्याची मागणी त्यांनी केली आहे. उर्वरित सायकलींची दुरवस्था होण्यास जबाबदार असलेल्यांवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.