Assam minister Chandra Mohan Patowary meet Dilip Desale Family in Panvel
पनवेल : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले जवान दिलीप देसले यांची आठवण आजही पनवेलवासीयांच्या मनात ताजी आहे. त्यांच्या बलिदानाची दखल घेत, आसाम राज्याचे पर्यावरण, वन आणि हवामान बदल कायदा व धोरण व्यवहार विभागाचे मंत्री चंद्रमोहन पटावरी यांनी आज (दि.२८) नवीन पनवेल येथील देसले कुटुंबीयांच्या घरी जाऊन त्यांची सदिच्छा भेट घेतली.
यावेळी त्यांनी दिलीप देसले यांच्या कुटुंबीयांना आपल्या वतीने ५ लाख रुपयांची आर्थिक मदत सुपूर्द केली. या भावनिक क्षणी त्यांनी शहीदाच्या त्यागाचे कौतुक करत, देसले यांच्या कुटुंबासाठी केंद्र आणि राज्य सरकार सदैव पाठीशी राहील, असे आश्वासन दिले.
महाराष्ट्र शासनामार्फत देखील शहीद दिलीप देसले यांच्या पत्नी उषा दिलीप देसले यांना ५० लाख रुपयांची मदत मंजूर करण्यात आली होती. यापैकी आज त्यांना ४५ लाख रुपयांचा अधिकृत धनादेश अदा करण्यात आला. यापूर्वी ५ लाख रुपये आधीच देण्यात आले होते. त्याचबरोबर मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून २ लाख ५० हजार रुपयांची रक्कम देखील आधीच त्यांच्या हाती सुपूर्द करण्यात आली आहे.
या भेटीप्रसंगी मंत्री पटावरी यांच्यासमवेत पनवेल उपविभागीय अधिकारी पवन चांडक, पनवेलचे तहसीलदार विजय पाटील, भाजप रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, तसेच माजी नगरसेवक अॅड. मनोज भुजबळ उपस्थित होते. या सर्वांनी कुटुंबीयांशी संवाद साधत त्यांना मानसिक आधार दिला.