Panvel Land Fraud Case Pudhari
रायगड

Panvel Land Fraud Case: इस्त्रायलमध्ये निधन झालेल्या दोन शेतकऱ्यांना जिवंत दाखवून जमीन विक्रीचा घोटाळा; पाच जणांना अटक

पनवेल पोलिसांची कामगिरी

पुढारी वृत्तसेवा

पनवेलः इस्रायलमध्ये निधन झालेल्या दोन शेतकऱ्यांना कागदोपत्री जिवंत दाखवून त्यांच्या नावावरील करंजाडे येथील ४७ गुंठे जमीन बनावट कागदपत्रांच्या आधारे विकल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

या व्यवहारातून बांधकाम व्यावसायिकाची २ कोटी २९ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पनवेल शहर पोलिसांनी पाच महिन्यांच्या तपासानंतर आरोपींना गोव्यातून अटक केली.

करंजाडे येथील सर्वेक्षण क्रमांक ८१/२ मधील ४७ गुंठे जमीन नाथन एलियाहू चिंचोलकर आणि शालोम ऊर्फ सेलीम एलियाहू चिंचोलकर यांच्या नावावर होती. हे दोघेही इस्रायलमध्ये वास्तव्यास गेले होते.

नाथन यांचे २०११मध्ये, तर शालोम यांचे २०१६मध्ये निधन झाले. त्यांचे वारसदार सध्या इस्रायल आणि अमेरिकेत वास्तव्यास असल्याची माहिती आरोपी सुरज वासुदेव शिंदे याला मिळाली, असे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांच्या माहितीनुसार, सुरज शिंदे याने स्वतःच्या वडिलांना नाथन चिंचोलकर म्हणून, तर मेहुणा मनीष मनोहर मोरे याला शालोम चिंचोलकर म्हणून उभे केले. त्यांच्या नावाने बनावट आधार कार्ड, पॅन कार्ड आणि इतर कागदपत्रे तयार करण्यात आली.

त्यानंतर पनवेल येथील दुय्यम निबंधक कार्यालयात प्रत्यक्ष हजर राहून ही जमीन सीबीडी बेलापूर येथील बांधकाम व्यावसायिक प्रशांत पाटेकर आणि त्यांचा मुलगा श्रेयस पाटेकर यांना विकण्यात आली. या प्रकरणी पनवेल शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर सुरज शिंदे कुटुंबीय व साथीदारांसह फरार झाला होता.

पोलिसांपासून बचाव करण्यासाठी तो वारंवार मोबाइल क्रमांक, निवासस्थान आणि राज्ये बदलत होता. तपासात तो महाराष्ट्रासह मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, दिल्ली, उत्तराखंड, राजस्थान, गुजरात आणि गोवा येथील विविध लॉज व हॉटेलमध्ये राहत असल्याचे समोर आले.

आरोपींच्या ताब्यातून मूळ जमीनमालक नाथन चिंचोलकर यांच्या नावाने बनविण्यात आलेले बनावट पॅनकार्ड आणि आधारकार्ड जप्त करण्यात आले आहेत. तसेच सूरज शिंदे आणि तेजस सुवे यांच्याविरोधात यापूर्वीही उरण पोलीस ठाण्यात फसवणुकीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणात आणखी काही आरोपींचा सहभाग असण्याची शक्यता असून, पनवेल शहर पोलीस पुढील तपास करत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT