Minor Boy Assault Case
पनवेल : शिक्षण देणाऱ्या गुरूकडूनच नात्याला काळिमा फासणारी एक संतापजनक घटना खारघरमध्ये उघडकीस आली आहे. जुन्या रागातून एका ११ वर्षीय मुलाचे अपहरण करून त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केल्याप्रकरणी साद कुर्ला मुसा पटेल नावाच्या मौलाना विरुद्ध खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगा पूर्वी पेठपाडा येथील एका मशिदीत अरबी आणि उर्दू शिक्षणासाठी जात होता. त्या काळात आरोपी मौलाना साद पटेल हा तिथे तात्पुरता शिकवण्यासाठी आला होता. शिकवत असताना तो मुलांना अमानुष मारहाण करत असे. याबाबत पीडित मुलाने आईला सांगितले होते, त्यानंतर त्याच्या आईने मशिदीत जाऊन मौलानाविरोधात तक्रार केली होती. याच रागातून ही क्रूर घटना घडल्याचे सांगितले जात आहे.
१६ मार्चरोजी रात्री ८ च्या सुमारास, पीडित मुलगा घराशेजारील दुकानात गेला असता, आरोपी मौलाना तिथे दुचाकीवर उभा होता. "तुला पेठपाड्यात शिकवताना खूप मारले होते, चल तुला फिरवून आणतो," असे बोलून त्याने मुलाला जबरदस्तीने दुचाकीवर बसवले. आरोपीने मुलाला ओवेगाव परिसरात फिरवून रात्री ९:१५ च्या सुमारास पेठपाडा फुटबॉल ग्राऊंडच्या मागील निर्जन मोकळ्या मैदानात नेले. तिथे त्याने मुलावर बळजबरीने अनैसर्गिक अत्याचार केला. इतकेच नव्हे तर, "जर आरडाओरडा केला किंवा कोणाला सांगितले, तर तुला खड्ड्यात फेकून देईन," अशी जीवे मारण्याची धमकीही दिली.
घाबरलेल्या अवस्थेत मुलाने घरी परतल्यावर रडत रडत आपली आपबीती आई-वडिलांना सांगितली. पालकांनी तत्काळ पेठपाडा मशिदीत जाऊन चौकशी केली असता आरोपीचे नाव साद कुर्ला मुसा पटेल असल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी पीडित मुलाच्या आईने दिलेल्या जबाबावरून खारघर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीला अटक करून पुढील तपास सुरू केला आहे.