Kamothe Society Robbery  Pudhari
रायगड

Panvel Robbery | कामोठेतील सोसायटीत धाडसी चोरी; महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून चोरटे पसार

कामोठे पोलिस ठाण्याच्या अगदी शेजारी असलेल्या सेक्टर-७ मधील अजिंक्य तारा सोसायटीत धाडसी चोरीची घटना घडली

पुढारी वृत्तसेवा

Kamothe Society Robbery

पनवेल : कामोठे पोलिस ठाण्याच्या अगदी शेजारी असलेल्या सेक्टर-७ मधील अजिंक्य तारा सोसायटीत शनिवारी रात्री धाडसी चोरीची घटना घडली. दोन अज्ञात चोरट्यांनी एका महिलेच्या गळ्यातील सुमारे ८ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून नेल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अजिंक्य तारा सोसायटीतील रहिवासी तेजल मोरे या शनिवारी रात्री सुमारे ८.३० वाजण्याच्या सुमारास घरगुती साहित्य खरेदी करून परतत होत्या. सोसायटीच्या आवारात प्रवेश केल्यानंतर त्यांचा पाठलाग करणाऱ्या चोरट्यांनी संधी साधली. मोरे या इमारतीच्या पायऱ्या चढत असताना एका चोरट्याने त्यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावले. त्यानंतर दोन्ही आरोपी काही क्षणांतच घटनास्थळावरून पसार झाले.

घटनेमुळे सोसायटीतील रहिवाशांमध्ये संताप आणि चिंतेचे वातावरण पसरले आहे. विशेष म्हणजे, ही सोसायटी कामोठे पोलिस ठाण्याच्या कंपाऊंडलगतच असल्याने पोलिस ठाण्याच्या जवळच अशी धाडसी चोरी घडल्याने परिसरातील सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

घटनेनंतर तेजल मोरे यांनी तातडीने कामोठे पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला असून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू असून आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथके कार्यरत करण्यात आली आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT