Kalamboli Jeweller Cheating Case
विक्रम बाबर
पनवेल : कळंबोलीतील एका नामांकित सराफा व्यावसायिकाने नवीन सोन्याचे दागिने तयार करून देण्याचे आमिष दाखवत ग्राहकांकडून सोन्याचे दागिने, सोन्याची नाणी आणि रोख रक्कम स्वीकारून तब्बल २ कोटी ४४ लाख १७ हजार ४२५ रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप समोर आला आहे. खांदेश्वर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका पोलीस हवालदाराने ३० लाख रुपयांच्या फसवणुकीची तक्रार दाखल केल्यानंतर हा कथित गैरव्यवहार उघडकीस आला असून, सराफा व्यवसायात खळबळ उडाली आहे.
तक्रारीनुसार, कळंबोलीतील ज्योतिर्लिंग ज्वेलर्सचे मालक महादेव नारायण चव्हाण यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हवालदार राजेश रामदास शेलार यांचा आरोपीशी सुमारे २० वर्षांचा परिचय असल्याने त्याच विश्वासाचा फायदा घेत कमी दरात व घडणावळ न आकारता नवीन डिझाइनचे दागिने तयार करून देण्याचे आमिष दाखविण्यात आल्याचा आरोप आहे.
तक्रारीनुसार, जानेवारी २०२५ मध्ये शेलार यांनी १९ तोळे सोन्याचे दागिने तसेच धनादेशाद्वारे रोख रक्कम देत एकूण ३० लाख रुपयांचा व्यवहार केला. सुरुवातीला काही महिन्यांपर्यंत मासिक परतावा देऊन विश्वास संपादन करण्यात आला. त्यानंतर अधिक गुंतवणूक करण्यास प्रवृत्त करण्यात आले. मात्र, कालांतराने ना नवीन दागिने मिळाले, ना मूळ रक्कम परत करण्यात आली, असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
या तक्रारीचा तपास सुरू असताना याच पद्धतीने इतर अनेक ग्राहकांकडूनही सोन्याचे दागिने, सोन्याची नाणी आणि रोख रक्कम स्वीकारून त्यांची फसवणूक करण्यात आल्याचे समोर आल्याचा दावा करण्यात आला आहे. उपलब्ध तक्रारींनुसार, कथित फसवणुकीची एकूण रक्कम २,४४,१७,४२५ रुपये इतकी असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे.
ग्राहकांचा विश्वास संपादन करण्यासाठी नवीन दागिने तयार करून देणे, घडणावळ माफ करणे आणि ठराविक कालावधीपर्यंत आकर्षक मासिक परतावा देण्याचे आश्वासन दिले जात होते. सुरुवातीला काही रक्कम परत करून विश्वास निर्माण करण्यात आला; मात्र नंतर दागिने किंवा पैसे परत करण्यास टाळाटाळ करण्यात आल्याचा आरोप तक्रारीत नमूद आहे.
या प्रकरणात आणखी काही फसवणूकग्रस्त पुढे येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. आर्थिक व्यवहार, पावत्या, धनादेश आणि सोन्याच्या व्यवहारांची सखोल चौकशी सुरू असून, सर्व तक्रारींची पडताळणी करण्यात येत आहे. त्यामुळे या कथित फसवणुकीची व्याप्ती आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, जुने सोन्याचे दागिने आणि सोन्याची नाणी स्वीकारून नवीन दागिने देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. त्यामध्ये पुढील व्यवहारांचा समावेश असल्याचा दावा करण्यात आला आहे.
संतोष पांडुरंग जगदाळे – रोख रक्कम, सोन्याचे दागिने व सोन्याची नाणी मिळून सुमारे ८.६६ लाख रुपये
हर्षला शिवाजी पाटील – १.७५ लाख रुपये
पांडुरंग सखाराम पाटील – ५ लाख रुपये
किरण अरुण महाजन – सुमारे ६.५० लाख रुपये किमतीची सोन्याची नाणी
सन्मेश भंडारे – सुमारे २.६८ लाख रुपये किमतीची सोन्याची चेन
रमेश संतोष महाजन – रोख रक्कम व सुमारे १३ लाख रुपये किमतीची सोन्याची नाणी स्वीकारल्याचा तक्रारीत आरोप करण्यात आला आहे.