

पनवेल : पनवेल रेल्वे पोलिसांनी रेल्वे प्रवाशांचे दागिने चोरणाऱ्या एका सराईत चोरट्याला अटक करून त्याच्याकडून तब्बल 26 लाख 31 हजार 68 किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने जप्त केले आहेत. आरोपीविरुद्ध मुंबई रेल्वेसह विविध राज्यांमध्ये चालत्या एक्स्प्रेस गाड्यांतील एसी डब्यांमध्ये प्रवाशांच्या बॅगा चोरी केल्याचे 39 गुन्हे दाखल असल्याची धक्कादायक माहिती तपासात समोर आली आहे.
17 जुलै 2026 रोजी दुपारी सुमारे 1 वाजता मंगला लक्षद्वीप एक्सप्रेस (क्र. 12617) पनवेल स्थानकाच्या फलाट क्रमांक 5 वर आल्यानंतर एसी डब्यातून एक व्यक्ती संशयास्पदरीत्या घाईघाईने बाहेर पडताना दिसली. कर्तव्यावर असलेले श्रेणी पोलीस उपनिरीक्षक एस. एम. पाटील, पोलीस हवालदार सोमनाथ इंगवले आणि कदम यांनी त्याला तात्काळ थांबवून चौकशी केली.
त्याच्याकडील सॅकबॅगची तपासणी केली असता मोठ्या प्रमाणात सोन्या-चांदीचे दागिने आढळून आले. दागिन्यांबाबत समाधानकारक माहिती देता न आल्याने त्याला पनवेल रेल्वे पोलीस ठाण्यात आणून सखोल चौकशी करण्यात आली. पोलीस निरीक्षक एन. बी. यमगर, महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक बी. एन. पुरी आणि पोलीस उपनिरीक्षक एस. डी. यादव यांनी केलेल्या चौकशीत आरोपीने रेल्वे प्रवाशांच्या बॅगा चोरून हे दागिने मिळविल्याची कबुली दिली.
तपासात आरोपीची ओळख रघू सुमन खोसला (वय 41), रा. लोनी देहात, गाझियाबाद (उत्तर प्रदेश), मूळ गाव पंजाब अशी पटली. त्याच्याविरुद्ध मुंबई रेल्वे पोलिसांसह विविध राज्यांमध्ये एसी डब्यांतील चोरीचे तब्बल 39 गुन्हे नोंद असल्याचे उघड झाले. त्याच्या गुन्हा करण्याच्या पद्धतीचा अभ्यास केल्यानंतर त्याला 18 जुलै रोजी अटक करण्यात आली.
जप्त करण्यात आलेल्या दागिन्यांची माहिती नियंत्रण कक्ष लोहमार्ग, मुंबईमार्फत देशभरातील रेल्वे पोलिसांना पाठविण्यात आली. त्यानंतर कोकण रेल्वे पोलीस, मडगाव (गोवा) यांनी हे दागिने त्यांच्या गुन्ह्यातील असल्याचे स्पष्ट केले. हा गुन्हा नेत्रावती एक्स्प्रेसमधील चोरीशी संबंधित आहे. फिर्यादी जेरील स्कायरिया हे कुटुंबासह केरळला जात असताना त्यांच्या पत्नीच्या डोक्याजवळ ठेवलेली सोन्या-चांदीचे दागिने आणि आयफोन असलेली हँडबॅग अज्ञात चोरट्याने लंपास केली होती. आयफोनचे लोकेशन मडगाव रेल्वे स्थानकावर दिसून आल्यानंतर कोकण रेल्वे पोलिसांकडे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या यशस्वी कारवाईत पोलीस निरीक्षक एन. बी. यमगर, महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक बी. एन. पुरी, पोलीस उपनिरीक्षक एस. डी. यादव, एम. डी. गवळी, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक एस. एम. पाटील, पोलीस हवालदार इंगवले आणि कदम यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. सध्या आरोपीला कोकण रेल्वे पोलिसांनी न्यायालयीन आदेशानंतर ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू ठेवला आहे.