पनवेल : मालकाने विश्वासाने शुद्धतेची तपासणी करण्यासाठी सोपविलेल्या तब्बल ६६ लाख ६२ हजार ३०० रुपये किंमतीच्या सहा सोन्याच्या लगडी घेऊन नोकर पसार झाल्याची घटना पनवेलमध्ये घडली. या प्रकारामुळे झवेरी बाजार परिसरात खळबळ उडाली असून, पनवेल शहर पोलिसांनी शुभम नावाच्या तरुणाविरुद्ध अपहाराचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपीचा शोध सुरू आहे.
पनवेलच्या झवेरी बाजार परिसरात रोशन कोळेकर (वय २४) यांचा सोन्याचे दागिने शुद्ध करण्याचा व्यवसाय आहे. शुभम हा गेल्या सुमारे आठ महिन्यांपासून त्यांच्या दुकानात काम करीत होता. त्यामुळे कोळेकर यांचा त्याच्यावर विश्वास होता.
दरम्यान, सोन्याच्या शुद्धतेची तपासणी करून आणण्यासाठी कोळेकर यांनी ६६६.२३ ग्रॅम वजनाच्या सहा सोन्याच्या लगडी शुभमकडे सोपवल्या. या सोन्याची एकूण किंमत ६६ लाख ६२ हजार ३०० रुपये होती. लगडी घेऊन शुभम जोशी आळी येथील मिडास हॉलमार्क सेंटरकडे रवाना झाला.
मात्र, बराच वेळ उलटूनही शुभम दुकानात परतला नाही. त्यामुळे कोळेकर यांना संशय आला. त्यांनी शुभमच्या मोबाइलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता मोबाइल बंद असल्याचे आढळले. त्यानंतर कोळेकर यांनी परिसरासह शुभमच्या संभाव्य ठिकाणी शोध घेतला; मात्र त्याचा कोणताही ठावठिकाणा लागला नाही.
अखेर विश्वासाने सोपविलेल्या लाखो रुपयांच्या सोन्याच्या लगडी घेऊन शुभम पसार झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर कोळेकर यांनी पनवेल शहर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा नोंदवून आरोपीचा शोध सुरू केला असून, सोन्याचा मुद्देमालही शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत.