Panvel Gauri Ganpati Shopping Pudhari
रायगड

Panvel Gauri Ganpati Shopping: पनवेलमध्ये गौरी-गणपती आगमनाचे वेध; दागिने, साड्या, आकर्षक वस्तूंच्या खरेदीसाठी महिलांची लगबग

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पनवेलमध्ये गौरी आगमनाची तयारी सुरू झाली आहे. साड्या, दागिने, फुले, कापड आणि सजावटीच्या वस्तूंच्या खरेदीसाठी बाजारपेठेत महिलांची लगबग वाढली.

पुढारी वृत्तसेवा

खांदा कॉलनी: श्री गणेशाच्या आगमनाचे वेध आता पनवेलकरांना लागले असून घराघरांत बाप्पाच्या स्वागताची जोरदार तयारी सुरू झाली आहे. गणरायाच्या आगमनाबरोबरच महिला वर्गाला आता गौरी आगमनाचेही वेध लागले आहेत. गौरीच्या स्वागतासाठी लागणाऱ्या विविध वस्तूंच्या खरेदीसाठी पनवेलच्या बाजारपेठेत महिलांची लगबग वाढू लागली आहे.

पनवेलमधील प्रमुख बाजारपेठेतील दुकाने सध्या रंगीबेरंगी सजावटीच्या साहित्याने सजली आहेत. गौरीसाठी आकर्षक साड्या, विविध प्रकारचे दागिने आणि पारंपरिक सजावटीच्या वस्तू दुकानांमध्ये उपलब्ध झाल्या आहेत.

सुंदर हार, बांगड्या, मंगळसूत्र, नथ, कानातील दागिने आणि अन्य आकर्षक साहित्य महिलांचे लक्ष वेधून घेत आहे. गौरीच्या सजावटीसाठी लागणारे विविध रंगांचे कापड, फुले आणि सजावटीच्या वस्तूंचीही मोठ्या प्रमाणात विक्री सुरू आहे. काही दुकानांमध्ये आकर्षक पद्धतीने सजविलेल्या गौराई नागरिकांचे विशेष लक्ष वेधून घेत आहेत.

पारंपरिक पद्धतीने गौरीचे स्वागत करण्यासाठी महिला वर्गाने आतापासूनच नियोजन सुरू केले आहे. गौरीला सुंदर साडी नेसविण्यापासून ते आकर्षक दागिन्यांनी सजविण्यापर्यंत विविध साहित्याची खरेदी केली जात आहे. यंदा पारंपरिकतेबरोबरच आधुनिक सजावटीच्या वस्तूंनाही महिला वर्गाची पसंती मिळत आहे. गणेशोत्सव जवळ येत असल्याने बाजारपेठेत दिवसेंदिवस गर्दी वाढत आहे.

विशेषतः सायंकाळच्या वेळेत खरेदीसाठी नागरिक मोठ्या संख्येने बाजारात येत आहेत. गणपती बाप्पाच्या आगमनानंतर गौरीपूजनाचा उत्सवही मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. त्यामुळे घरातील महिलांकडून गौरीच्या स्वागतासाठी विशेष तयारी केली जात आहे. साडी, दागिने आणि पूजेच्या साहित्याबरोबरच घराच्या सजावटीसाठीही खरेदी केली जात आहे.

बाजारपेठांमध्ये सध्या सणोत्सवाचे चैतन्य आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. दुकानदारांनीही गणेशोत्सव आणि गौरीपूजनाच्या पार्श्वभूमीवर विविध प्रकारचे साहित्य उपलब्ध करून ठेवले आहे. काही ठिकाणी सजविलेल्या गौराई पाहण्यासाठी नागरिकांचीही गर्दी होत आहे. लहान मुलांपासून महिलांपर्यंत सर्वच जण सणाच्या तयारीत व्यस्त असल्याचे चित्र आहे.

‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाबरोबरच आता गौरी आगमनाच्या तयारीने पनवेलची बाजारपेठ गजबजू लागली आहे.

आगामी काही दिवसांत ही खरेदी आणखी वाढणार असून बाजारपेठेतील उलाढालही वाढण्याची अपेक्षा दुकानदारांनी व्यक्त केली आहे. गणरायाच्या स्वागतासोबतच गौराईच्या आगमनासाठी पनवेलकर महिला वर्ग सज्ज झाला आहे. बाप्पाच्या आगमनानंतर आता गौराईच्या स्वागतासाठी सजलेली पनवेलची बाजारपेठ सणोत्सवाच्या रंगात रंगून गेली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT