

श्रीकृष्ण बाळ
महाड: यावर्षी पावसाला उशिरा सुरुवात झाल्यानंतर काहीसा चिंतेत असलेल्या महाडकरांना आणि बळीराजाला आता मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या काही दिवसांपासून महाड तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने पर्जन्यमानाने तब्बल तीन हजार मिलिमीटरचा टप्पा पार केला आहे.
दमदार पावसामुळे तालुक्यातील धरणे, तलाव, नदी-नाले आणि ओढे तुडुंब भरू लागले असून अनेक ठिकाणी जलसाठे भरून वाहू लागले आहेत.
महाड हा रायगड जिल्ह्यातील अतिवृष्टीचा प्रदेश म्हणून ओळखला जातो. येथे दरवर्षी साधारणपणे तीन हजार २०० ते तीन हजार ५०० मिलिमीटरच्या आसपास सरासरी पाऊस पडतो. यंदा मात्र पावसाळ्याच्या सुरुवातीला पावसाने काहीशी ओढ दिल्याने शेतकरी चिंतेत होते.
पेरणी केलेल्या पिकांना पुरेसा पाऊस मिळेल का, तसेच जलसाठे भरतील का, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. मात्र, त्यानंतर पावसाने जोरदार पुनरागमन करत परिस्थितीच बदलून टाकली आहे.
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार आणि मुसळधार पावसामुळे महाड तालुक्यातील जलस्रोतांना नवसंजीवनी मिळाली आहे. डोंगर-दऱ्यांमधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह सुरू झाल्याने नदी-नाल्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे.
काही भागांत लहान-मोठे ओढे दुथडी भरून वाहत आहेत. धरणांच्या पाणीसाठ्यातही झपाट्याने वाढ होत असून अनेक जलसाठे पूर्ण क्षमतेच्या दिशेने वाटचाल करत आहेत.
पावसाचा जोर कायम राहिल्याने शेतीसाठी आवश्यक असलेले पाणी उपलब्ध झाले आहे. भातशेतीसाठी प्रसिद्ध असलेल्या महाड परिसरातील शेतकऱ्यांमध्ये त्यामुळे समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. पावसाची सुरुवातीची कमतरता भरून काढत निसर्गाने आता जोरदार साथ दिल्याने ‘बळीराजा सुखावला’ अशी भावना ग्रामीण भागातून व्यक्त होत आहे.
दरम्यान, महाड शहरासह ग्रामीण भागातील जनजीवनावरही पावसाचा परिणाम जाणवत आहे. काही सखल भागांत पाणी साचण्याच्या घटना घडत असून नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याची गरज आहे. डोंगराळ भागात दरडी कोसळण्याचा धोका लक्षात घेता प्रशासनानेही सतर्क राहणे आवश्यक आहे.
आगामी काळातील पाऊस महत्त्वाचा
आता पावसाळ्याचे पुढील दिवस महत्त्वाचे ठरणार आहेत. पावसाचा जोर कायम राहिल्यास महाडची वार्षिक सरासरी तीन हजार २०० ते तीन हजार ५०० मिलिमीटर सहज गाठली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे यंदाचा पावसाळा महाडकरांसाठी जलसमृद्धीचा ठरणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
तीन हजार मिलिमीटरचा टप्पा पार झाल्याने महाडच्या पावसाळ्याने आता खरी रंगत पकडली असून, शेतकरी, ग्रामस्थ आणि जलस्रोतांसाठी ही निश्चितच दिलासादायक बातमी ठरली आहे.