पनवेल: दिवाळी व आगामी सणासुदीच्या पार्श्वभूमीवर अन्नपदार्थांची गुणवत्ता आणि ग्राहकांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) पथकाने रायगड जिल्ह्यातील पनवेल येथील जवाहर सहकारी औद्योगिक वसाहतीत शनिवारी मोठी कारवाई केली.
या कारवाईत अजफान इंटरनॅशनल रिटेल्स एलएलपी या कंपनीतील विविध अन्नपदार्थांचा एकूण ४ कोटी २१ लाख ६ हजार ९६१ रुपये किमतीचा साठा जप्त करण्यात आला. संबंधित अन्नपदार्थ अयोग्य नामकरण केलेले (मिसब्रँडेड) असल्याचे तसेच निकृष्ट दर्जाचे असण्याचा संशय असल्याने ही कारवाई करण्यात आली.
या प्रकरणात अन्नपदार्थांच्या नामनिर्देशन (लेबलिंग) व गुणवत्तेबाबत आढळलेल्या बाबींच्या अनुषंगाने अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, २००६ मधील कलम २३, २६ व २७ अंतर्गत तरतुदींच्या उल्लंघनाच्या अनुषंगाने कारवाई करण्यात आली. संबंधित अन्नपदार्थ अयोग्य नामकरण केलेले असल्याचे तसेच निकृष्ट दर्जाचे असण्याचा संशय असल्याने पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी आवश्यक ती प्रक्रिया करण्यात येत आहे.
ही कारवाई सहायक आयुक्त (अन्न) ए. ए. मैत्रे आणि एम. आर. महांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सहआयुक्त (अन्न) सचिन जाधव यांच्या प्रशासकीय देखरेखीखाली अन्न सुरक्षा विभागाकडून पुढील आवश्यक कार्यवाही करण्यात येत आहे.
या कारवाईत अन्न सुरक्षा अधिकारी श्रीमती पी. ए. भंडारकर यांच्यासह गुप्तचर विभागाचे अन्न सुरक्षा अधिकारी यू. एस. बडे , अन्न सुरक्षा अधिकारी जी. एम. साबळे आदिंनी सहभाग घेतला.
दिवाळी व सणासुदीच्या काळात नागरिकांना सुरक्षित व दर्जेदार अन्नपदार्थ उपलब्ध व्हावेत, यासाठी अन्न व औषध प्रशासनाकडून विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येत असून, अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध नियमानुसार कठोर कारवाई करण्यात येत असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाने दिली आहे.