पनवेल प्रतिनिधी : अमेरिका–इराण यांच्यात सुरू असलेल्या तणावाचा परिणाम आता स्थानिक पातळीवर जाणवू लागला असून पनवेल शहरात घरगुती गॅस सिलेंडरचा तुटवडा निर्माण झाल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. मागील दोन ते तीन दिवसांपासून शहरातील अनेक गॅस एजन्सींमध्ये सिलेंडरचा पुरवठा कमी झाल्याने नागरिक सकाळपासूनच रांगा लावत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
पनवेलमधील विविध भागांतील गॅस एजन्सीसमोर सकाळीच नागरिकांची मोठी गर्दी होत असून सिलेंडर मिळवण्यासाठी लोकांना तासन्तास रांगेत उभे राहावे लागत आहे. अनेक नागरिक सकाळपासून पाच ते सहा तास प्रतीक्षा करत असतानाही त्यांना सिलेंडर मिळत नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. काही ठिकाणी तर गॅस सिलेंडरचा साठा संपल्याचे सांगितले जात असून त्यामुळे अनेकांना रिकाम्या हाताने परत जावे लागत आहे.
घरगुती गॅस हा रोजच्या स्वयंपाकासाठी अत्यावश्यक असल्याने सिलेंडर न मिळाल्यास कुटुंबांसमोर मोठी अडचण निर्माण होत आहे.
विशेषतः नोकरदार कुटुंबे आणि लहान मुलं असलेल्या घरांमध्ये गॅस संपल्यामुळे स्वयंपाक कसा करायचा, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
गॅस एजन्सींमध्ये वाढलेल्या गर्दीमुळे काही ठिकाणी गोंधळाचे वातावरणही निर्माण होत असल्याचे दिसून येत आहे. सिलेंडरचा पुरवठा कमी असल्याने एजन्सीकडून मर्यादित प्रमाणातच वितरण केले जात आहे. परिणामी अनेकांना दिवसभर प्रतीक्षा करूनही निराश होऊन घरी परतावे लागत आहे.
याबाबत संतप्त नागरिकांनी प्रशासनाकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी केली आहे. “सकाळपासून आम्ही रांगेत उभे आहोत, पण अजूनही सिलेंडर मिळालेला नाही. घरात गॅस संपला आहे, त्यामुळे स्वयंपाक करणे कठीण झाले आहे. प्रशासनाने याकडे लक्ष देऊन तातडीने गॅसचा पुरवठा वाढवावा,” अशी प्रतिक्रिया एका नागरिकाने व्यक्त केली.
दरम्यान, नागरिकांनी सरकारने व्यावसायिक वापरासाठी दिल्या जाणाऱ्या सिलेंडरच्या पुरवठ्यावर काही प्रमाणात मर्यादा घालून घरगुती वापरासाठी सिलेंडरला प्राधान्य द्यावे, अशी मागणी केली आहे. तसेच गॅस पुरवठ्यावर योग्य नियंत्रण ठेवून नागरिकांना होणारा त्रास तातडीने कमी करावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.