Panvel encroachment drive pudhari photo
रायगड

Panvel encroachment drive : पनवेलमध्ये अतिक्रमण विरोधी पथकाचा बडगा

कळंबोली, खारघर, कामोठे परिसरात अतिक्रमणांवर कारवाई, पदपथ झाले मोकळे

पुढारी वृत्तसेवा

पनवेल : पनवेल महापालिका आयुक्त मंगेश चितळे यांच्या सूचनेनुसार पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील मुख्य रस्ते आणि फुटपाथ मोकळे ठेवण्यासाठी पालिका प्रशासनाने अतिक्रमण विरोधी मोहीम अधिक तीव्र केली आहे. गेल्या चार दिवसांपासून महानगरपालिकेच्या प्रभाग समिती ‘ड’ पनवेलच्या माध्यमातून अतिक्रमण विभागाने शहरातील अनधिकृत हातगाड्या आणि फळे-भाजी विक्रेत्यांवर मोठी कारवाई केली. १ ते ४ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत राबवलेल्या या मोहिमेत तब्बल २ लाख ७ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

पालिकेच्या अतिक्रमण विभागाच्यावतीने पनवेलसह कळंबोली, खारघर, कामोठे आणि नावडे उपविभाग परिसरात विनापरवाना व अनधिकृतपणे थाटलेल्या दुकानांवर अन् फेरीवाल्यांवर धडक दंडात्मक कारवाई करण्यात आली. पदपथ मोकळे झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

कळंबोली परिसरातील सेंट जोसेफ शाळेसमोर विद्यार्थी व पालकांची कायम मोठी वर्दळ असते. मात्र, फुटपाथवरील अतिक्रमणामुळे नागरिकांना थेट मुख्य रस्त्यावरून चालावे लागत होते. ही बाब लक्षात घेऊन फुटपाथवर अनधिकृतपणे थाटलेल्या स्टॉल्सवर पालिका कर्मचाऱ्यांनी थेट कारवाई करून जागा मोकळी केली. तसेच, या मार्गावरील नर्सरी चालकांना प्रशासनाकडून अंतिम इशारा देण्यात आला असून, त्यांनी विक्रीसाठी रस्त्यावर ठेवलेली झाडे तत्काळ हटवण्यात आली आहेत.

खारघर क्षेत्रातही अनधिकृतपणे खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्यांवर पालिका पथकाने कारवाईचा बडगा उगारला आहे. रस्त्याच्या कडेला आणि दुकानांच्या बाहेरील मोकळ्या जागेत अनधिकृतपणे साहित्य ठेवून अतिक्रमण करणाऱ्या दुकानदारांचे सामान जप्त करण्यात आले. व्यापाऱ्यांनी दुकानाची हद्द ओलांडून बाहेर मांडलेले साहित्य अतिक्रमण विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तत्काळ जप्त केले.

२८ हजारांचा दंड वसूल

प्रभाग समिती 'क' कामोठे अंतर्गत ३ ऑक्टोबर २०२६ रोजी विशेष मोहीम राबवून अतिक्रमण हटवण्यात आले. या कारवाईत कामोठे परिसरातून तब्बल २८ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

नावडे उपविभागात १२ हजारांची दंडात्मक कारवाई नावडे परिसरात अनधिकृतपणे व्यवसाय करणाऱ्या हातगाड्या आणि फळे-भाजी विक्रेत्यांवर दंडात्मक कारवाई करत शनिवारी १२ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

पनवेल, कामोठे आणि नावडे या तिन्ही उपविभागांतून आतापर्यंत एकूण २ लाख ४७ हजार रुपये दंडात्मक रक्कम पालिकेच्या तिजोरीत जमा झाली आहे. पालिकेच्या माध्यमातून होणारी ही कारवाई नरचेवर करावी अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली.

पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील मुख्य रस्ते, शाळांचे परिसर आणि सार्वजनिक जागा अतिक्रमणमुक्त करण्यासाठी ही धडक मोहीम यापुढेही अशीच सुरू राहील. नागरिक आणि स्थानिक व्यापाऱ्यांनी सार्वजनिक जागांवर अनधिकृतपणे सामान ठेवून वाहतुकीस अथवा पादचाऱ्यांना अडथळा निर्माण करू नये.
महेश कुमार मेघमाळे, अतिरिक्त आयुक्त, पनवेल महानगरपालिका.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT