पाली तालुक्याचे मोबाईल नेटवर्क ‌‘नॉट रिचेबल‌’च  pudhari photo
रायगड

Pali mobile network issue : पाली तालुक्याचे मोबाईल नेटवर्क ‌‘नॉट रिचेबल‌’च

मोबाईल सेवा ढासळली, ग्राहक संतप्त

पुढारी वृत्तसेवा

पाली ः पाली व परिसरात जिओच्या मोबाईल नेटवर्कची सध्याची अवस्था केवळ तांत्रिक बिघाडापुरती मर्यादित राहिलेली नाही; ती थेट ग्राहकांच्या संयमाची परीक्षा घेणारी ठरत आहे. मोबाईलवर सतत दिसणारा ‌‘नॉट रिचेबल‌’ हा संदेश, वाढते कॉल ड्रॉप आणि वारंवार ठप्प होणारी इंटरनेट सेवा हे आता अपवाद राहिले नसून जिओ ग्राहकांचे रोजचे वास्तव बनले आहे.

पालीसारख्या ग्रामीण-निमशहरी भागात हीच अत्याधुनिक यंत्रणा कुचकामी ठरत असल्याचा अनुभव ग्राहक घेत आहेत. वर्षभराचे प्लॅन भरूनही फोन उपयोगात येत नसेल, तर ग्राहकांनी पैसे नेमके कशासाठी भरायचे, हा मूलभूत प्रश्न उभा राहतो.

पॅकेज संपले की क्षणाचाही विलंब न करता इन्कमिंगआउटगोइंग बंद केले जाते; मात्र पॅकेज सुरू असताना दर्जेदार नेटवर्क देण्याची जबाबदारी मात्र ढकलली जाते. ही सेवा नाही, तर केवळ वसुलीची व्यवस्था असल्याची भावना ग्राहकांमध्ये बळावत आहे. सेवा देण्यात अपयश येत असताना ग्राहकांनी गप्प बसावे, अशीच जिओची अपेक्षा आहे का, असा सवाल उपस्थित होत आहे.

ग्राहकसंख्या झपाट्याने वाढवताना त्या तुलनेत टॉवर क्षमता, नेटवर्क विस्तार आणि देखभाल याकडे दुर्लक्ष झाले आहे का, याचा गांभीर्याने विचार होणे आवश्यक आहे. ग्राहकसंख्या आणि टॉवर क्षमतेतील तफावत वाढली असेल, तर त्याची किंमत ग्राहकांनी मनस्ताप सहन करून का भरावी? अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा गवगवा करून प्रत्यक्षात अपुरी सेवा देणे ही ग्राहकांशी फसवणूकच नव्हे काय? आज पालीतील जिओ ग्राहकांचा सवाल साधा आहे सेवा हवी, जाहिरात नाही.

रिलायन्स जियो ने तातडीने नेटवर्कची वस्तुस्थिती स्वीकारून टॉवर क्षमता वाढवावी, कॉल ड्रॉप थांबवावेत आणि दर्जेदार सेवा द्यावी. अन्यथा ग्राहकांचा विश्वास, जो एकदा गमावला गेला, तो पुन्हा मिळवणे सोपे नसते अशा संतप्त प्रतिक्रिया ग्राहकांच्या येत आहेत.

आम्ही वेळेवर पैसे भरतो, वर्षाचे पॅकेज घेतो; पण नेटवर्कच नसेल तर मोबाईल कशासाठी? अत्यावश्यक कॉलही होत नाहीत. पॅकेज संपले की लाईन बंद होते, मग पॅकेज असूनही रेंज देऊ शकत नसतील तर जिओ घ्यायचेच का? हा सवाल केवळ एका ग्राहकाचा नसून संपूर्ण परिसराचा आहे.
सचिन खिवंसरा, पालीतील व्यापारी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT