पालीत रस्त्यांवरील अतिक्रमणांमुळे पार्किंगची समस्या गंभीर pudhari photo
रायगड

Illegal encroachment : पालीत रस्त्यांवरील अतिक्रमणांमुळे पार्किंगची समस्या गंभीर

आधी व्यवस्था करा, त्यानंतरच नो पार्किंगचे फलक लावा; पालीकरांची नगरपंचायतीकडे मागणी

पुढारी वृत्तसेवा

पाली : शरद निकुंभ

शहरात वाहतूक शिस्त लावण्याच्या उद्देशाने पाली नगरपंचायतीकडून वाहन चालकांना गाडी कुठे उभी करावी व कुठे करू नये, याबाबतचे फलक विविध ठिकाणी लावण्यात आले आहेत. मात्र प्रत्यक्ष परिस्थिती पाहता ‌‘नो पार्किंग‌’च्या फलकाच्या अगदी शेजारीच वाहने उभी असल्याचे चित्र दिसून येत असून, फलक आणि वास्तव यातील दरी ठळकपणे समोर येत आहे. त्यामुळे आधी पार्किंगची व्यवस्था आणि अतिक्रमण हटवा, त्यानंतरच फलक लावा, असा थेट सवाल पालीकर नागरिक नगरपंचायतीला विचारत आहेत.

नगरपंचायतीने फलक लावले म्हणजे जबाबदारी पूर्ण झाली आणि पुढील सर्व कारवाई पोलिसांची, असा पळवाटीचा दृष्टिकोन योग्य नसल्याची भावना व्यक्त होत आहे. नियम असतील, तर त्यांची अंमलबजावणीही तितक्याच कडकपणे झाली पाहिजे. फलक लावूनही नियमभंग करणाऱ्या वाहनांवर कारवाई होत नसेल, तर ते फलक म्हणजे नगरपंचायतीच्या निर्णयांचा उघड अपमान ठरत असल्याचे मत नागरिक व्यक्त करत आहेत. पोलिस प्रशासनाने अशा ठिकाणी तातडीने दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी पुढे येत आहे.

याचबरोबर, पालीतील अनेक मुख्य रस्त्यांवर दुकाने पुढे आलेली असून अतिक्रमणामुळे रस्ते अरुंद झाले आहेत. यामुळे वाहतूक कोंडी, पादचाऱ्यांची गैरसोय आणि अपघातांचा धोका वाढत आहे. मात्र या अतिक्रमणांबाबत नगरपंचायतीकडून ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप नागरिक करत आहेत.

अतिक्रमणावर मौन बाळगून फक्त ‌‘नो पार्किंग‌’चे फलक लावले जात असतील, तर तो केवळ वाहन चालकांवर होणारा अन्याय असल्याची भावना तीव्र होत आहे. पार्किंगसाठी नियोजनबद्ध जागा निश्चित करा, त्या ठिकाणी आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्या आणि त्यानंतरच नियमांची कडक अंमलबजावणी करा, अशी स्पष्ट अपेक्षा पालीकर नागरिक व्यक्त करत आहेत. नगरपंचायत आणि पोलीस प्रशासन यांच्यात समन्वय साधूनच वाहतूक नियम राबवले गेले, तरच शहरात शिस्तबद्ध वाहतूक व्यवस्था निर्माण होईल, असे नागरिकांचे मत आहे.

पाली हे वर्दळीचे आणि बाजारपेठेचे शहर असल्याने दुचाकी व चारचाकी वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अशा परिस्थितीत नगरपंचायतीने वाहन पार्किंगसाठी स्वतंत्र, अधिकृत आणि पुरेशी जागा उपलब्ध करून देणे अत्यावश्यक आहे. पार्किंगची ठोस सोय नसताना थेट रस्त्यांवर ‌‘नो पार्किंग‌’चे फलक लावणे म्हणजे सामान्य वाहन चालकांना अडचणीत टाकण्यासारखे असल्याची भावना आहे. पालीत पार्किंगसाठी जागा उपलब्ध असतानाही तिचे नियोजन व विकास न होणे ही प्रशासनाची मोठी त्रुटी मानली जात आहे.
वेत्रवान गुरव, पाली

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT