Pali Dirty Water Supply Pudhari
रायगड

Pali Dirty Water Supply: अष्टविनायक क्षेत्रातच गढूळ पाण्याचा पुरवठा! अंबा नदीचे पाणी थेट घराघरांत; शुद्धीकरण योजनेची प्रतीक्षा

अंबा नदीचे पाणी थेट नागरिकांना; सांडपाणी, प्रदूषित पाणी, कचरा आणि वाळू उपशामुळे जलप्रदूषणाचा धोका

पुढारी वृत्तसेवा

संतोष उतेकर

सुधागड: अष्टविनायक तीर्थक्षेत्र पाली शहराला अशुद्ध व गढूळ पाण्याचा पुरवठा होत असून शुद्ध पाणीपुरवठा योजनेची प्रतीक्षा कायम आहे. पाऊस थांबल्याने अंबा नदीचे पाणी प्रचंड गढूळ झाले आहे.

पालीकरांना थेट अंबा नदीतून कोणतीही शुद्धीकरण प्रक्रिया न करता पाणी पुरवले जाते. नदीत सोडण्यात येणारे सांडपाणी, कंपन्यांचे प्रदूषित पाणी, कचरा आणि वाळू उपसामुळे पाणी दूषित झाले असून नागरिक व जीवसृष्टीचे आरोग्य धोक्यात आले आहे.

सध्या येणारे पाणी इतके गढूळ आहे की त्यातून अंघोळ काय तर कपडे व भांडी सुद्धा घासले जाऊ शकत नाही. पिण्यासाठी वापरणे तर दुरूच. वितरित होणाऱ्या पाण्यावर क्लोरीनेशन किंवा कोणतीही प्रक्रिया होत नसल्याने कित्येक वर्षे नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू आहे.

हजारो नागरिक आणि दररोज येणारे हजारो भाविक यांना नाईलाजाने हेच दूषित पाणी वापरावे लागते. नळांतून अनेकदा जिवंत साप, खुबे, शिंपले, मासे, किडे, तसेच गाळ आणि शेवाळ बाहेर येण्याचे प्रकार घडत आहेत.

योजना लालफितीती

१९७४ मध्ये मंजुरी मिळालेल्या या योजनेचा खर्च आता २५ कोटींवर पोहोचला आहे. राजकीय हेवेदावे आणि प्रशासकीय लालफितीत ही योजना अडकली आहे. दर निवडणुकीत राजकीय पक्षांचे नेते व मंत्री आश्वासन देतात, मात्र परिस्थिती 'जैसे थे'च आहे.

२००८-०९ च्या सर्व्हेनुसार ७ कोटी ७९ लाखांच्या निधीतून ही योजना आखली होती. पुढे 'क' दर्जा तीर्थक्षेत्रामुळे १० टक्के लोकवर्गणीची अट शिथिल झाली. २०२२ मध्ये नगरपंचायतीची स्थापना झाल्यानंतर २५ कोटींचा नवा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. मात्र अजून तो लालफितीत आहे.

वारंवार अर्ज विंनत्या करून देखील अजूनही शुद्ध पाणी पुरवठा योजना सुरु झालेली नाही. दर निवडणुकीला याचे राजकारण करायचे सत्ता मिळवायची आणि पुढे जनतेच्या तोंडाला पाने पुसायची हेच आतापर्यंत पालीकर जनता पाहत आली आहे. मात्र नागरिकांच्या संयमाचा बांध आता फुटत चालला आहे. आता आम्ही न्यायालयात जनहीत याचिका टाकणार आहोत.
- कपिल पाटील, सामाजिक कार्यकर्ते, पाली
शुद्ध पाणीपुरवठा योजनेची फाईल मंजुरीसाठी नगर विकास विभागयेथे सध्या आहे. तिथे अव्वर सचिव यांची मान्यता मिळाल्यावर एक बैठक होईल, आणि त्यानंतर पुढे मंजुरीची प्रक्रिया होईल. पालीतील योजनेला मंजुरी मिळू शकेल. पाली शुद्ध पाणीपुरवठा योजना मंजुरी व इतर विकास कामासंदर्भात मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याकडे पत्रव्यवहार केला आहे. शुद्ध पाणी योजना कार्यान्वित होण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे.
- सुलतान बेनसेकर, उपनगराध्यक्ष पाली नगरपंचायत

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT