Nutmeg Farming Konkan Pudhari
रायगड

Nutmeg Farming Konkan: जायफळ लागवड : कोकणातील बागायतदारांसाठी शाश्वत उत्पन्नाचा आधार

चौल-रेवदंड्यात 2000 झाडांची यशस्वी लागवड; शाश्वत उत्पन्नासाठी नवा पर्याय

पुढारी वृत्तसेवा

रायगड : कोकणातील पारंपरिक नारळ-सुपारीच्या बागांमध्ये आता जायफळ हे पीक शेतकऱ्यांच्या शाश्वत उत्पन्नाचे एक प्रमुख साधन बनू लागले आहे. चौल येथील प्रयोगशील शेतकरी शैलेश राईलकर यांनी स्वतः जायफळाची लागवड करुन, त्या योगे उत्पन्न वृद्धीचा नवा मार्ग अवलंबला आहे. चौल आणि रेवदंडा परिसरात सुमारे दोनशे वाड्यांमधून आजघडीला सरासरी दोन हजार जायफळाची झाडे दिमाखात उभी आहेत. निसर्ग चक्रीवादळानंतर या झाडांच्या संख्येत घट झाली असली, तरी बागायतदारांनी जिद्दीने पुन्हा नव्याने जायफळ लागवड करून हे पीक सावरले असल्याची माहिती शैलेश राईलकर यांनी दिली आहे.

जायफळाच्या झाडाला कडक ऊन मानवत नाही. चौल-रेवदंडा परिसरातील नारळ-सुपारीच्या वाड्यांमधील दाट सावली, मुबलक पाणी आणि दमट हवामान या पिकासाठी अत्यंत पोषक ठरत आहे. दापोली कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या फांदी कलम पद्धतीमुळे आता दर्जेदार मातृवृक्षांपासून कलमे तयार केली जात आहेत. बियाण्यांपासून तयार झालेली रोपे साधारण 7 ते 8 वर्षांनी उत्पादन देण्यास सुरुवात करत असे राईलकर यांनी सांगीतले.

जायफळाचे झाड जसे वयाने मोठे होते, तसे त्याचे उत्पादन वाढत जाते. 7 ते 8 वर्षांचे झाड 100 ते 150 फळ देते तर 20 ते 25 वर्षांचे झाड प्रति झाड सुमारे 1000 फळे देते. दरम्यान चौलमध्ये एका जुन्या झाडाला सुमारे 2000 फळे लागल्याची नोंद असल्याचे राईलकर यांनी सांगीतले. जायफळामध्ये नर आणि मादी अशी स्वतंत्र झाडे असतात. परागीभवनासाठी नर झाडांचे अस्तित्व महत्त्वाचे असल्याने अनुभवी बागायतदार ही झाडे तोडून टाकत नसल्याचे त्यांनी पूढे सांगीतले. पावसाळ्यात जून ते ऑगस्ट या कालावधीत असल्याने फळे वाळवण्यासाठी आता आधुनिक विद्युत वाळवणी यंत्रांचा वापर केला जात आहे, ज्यामुळे जायफळाचा दर्जा उत्तम राहतो.अन्नाला सुगंध येण्यासाठी जायफळ पावडर, मसाल्यात लालभडक जायपत्री, तर सालापासून लोणचे, मुखवास आणि सरबत बनवले जाते. जायफळाच्या जंतुनाशक गुणधर्मांमुळे औषधे आणि तेलात याचा वापर होतो. लहान मुलांच्या पोटाच्या विकारांवर (जुलाब) दुधातून जायफळ उगाळून देण्याची जुनी आरोग्य प्रथा आहे.

बागायतदारांना जायफळातून मिळणारे उत्पन्न समाधानकारक आहे. जायफळाचा घाऊक दर 6ते 7 रुपये प्रति नग, तर किरकोळ दर 10ते 12 रुपये आहे. जायपत्रीचा घाऊक दर 1200ते 1500 रुपये प्रति किलो, तर किरकोळ विक्री दर 2000 ते 3000 रुपयांपर्यंत असतो.नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये जायफळाचे दर 700 ते 800 रुपये प्रति किलोच्या दरम्यान असल्याचे त्यांनी सांगीतले.

कोकणातील नारळ-सुपारीच्या वाड्यांमधील दाट सावली, मुबलक पाणी आणि दमट हवामान जायफळ पिकासाठी अत्यंत पोषक आहे. जायफळ लागवडीतून मोठे उत्पादन आणि स्वाभाविकच मोठी आर्थिक प्राप्त शेतकऱ्यास होवू शकते. त्याकरिता दापोली कोकण कृषी विद्यापीठाने जायफळाच्या उच्च दर्जाच्या जाती विकसीत केल्या असून ,त्यांची रोपे आणि दर्जेदार मातृवृक्षांपासून कलमे देखील उपलब्ध करुन दिली आहेत.कोकणातील नारळ बागायतदारांनी जायफळाची लागवड व्यावसायिक दृष्टीकोनातून करणे गरजेचे आहे.
डॉ.रवींद्र मर्दाने, कृषी विस्तार शिक्षण शास्त्रज्ञ,प्रादेशिक कृषी संशोधन केंद्र,कर्जत-रायगड

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT