Flamingo migration Navi Mumbai Pudhari
रायगड

Flamingo migration Navi Mumbai: फ्लेमिंगो तलावावर पर्यटकांचा ताण वाढतोय

डीपीएस, टीएससी वेटलँड्स पुनर्जीवित करा! पर्यावरणवाद्यांची राज्य सरकारकडे मागणी

पुढारी वृत्तसेवा

उरण: नवी मुंबईतील एनआरआय तलावातील फ्लेमिंगोंच्या मनमोहक थव्यांचे दर्शन घेण्यासाठी सध्या शेकडो पक्षीप्रेमी आणि पर्यटकांची अरुंद किनाऱ्यावर प्रचंड गर्दी होत आहे. यामुळे या एकमेव अधिवासावर कमालीचा ताण येत असून, हा ताण कमी करण्यासाठी आणि शहरातील पक्षीनिरीक्षणाच्या संधी वाढवण्यासाठी शेजारील डीपीएस आणि टीएस चाणक्य वेटलँड्सचे तातडीने पुनरुज्जीवन करण्यात यावे, अशी आग्रही मागणी पर्यावरणवाद्यांनी केली आहे.

शेजारच्या शहरांमधूनही मोठ्या संख्येने पर्यटक येत असल्याने सध्या एनआरआय तलाव क्षेत्र हे एक अनधिकृत पर्यावरण पर्यटन केंद्र म्हणून उदयास आले आहे, असे नॅटकनेक्ट फाउंडेशनने सांगितले. स्थलांतरित पक्षी आणि निसर्गप्रेमी या दोघांच्याही हितासाठी तिन्ही वेटलँड्स (पाणथळ जागा) पुनर्जीवित करावेत, असे आवाहन संस्थेने राज्य सरकारला केले आहे.

डीपीएस आणि टीएस चाणक्य वेटलँड्समध्ये पाणी साचून राहिल्याने आणि निळ्या-हिरव्या शेवाळाची अतिवृद्धी झाल्याने तेथील पाणी विषारी बनले आहे. परिणामी, भरतीच्या वेळी ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्यातून बाहेर पडणाऱ्या फ्लेमिंगोंसाठी आता एनआरआय तलावाचा काही भागच प्रमुख आश्रयस्थान बनला आहे.

जागतिक महत्त्वाच्या रामसर स्थळाचा दर्जा असलेल्या या अभयारण्यात हिवाळा आणि उन्हाळ्यात स्थलांतरित फ्लेमिंगो मोठ्या संख्येने येतात आणि पावसाळा सुरू होण्यापूर्वी कच्छच्या दिशेने परततात.

लेसर फ्लेमिंगो प्रामुख्याने उथळ खाऱ्या आणि अल्कलाइन पाण्यातील सूक्ष्म अन्नस्रोतांवर जगतात. ते निळे-हिरवे शेवाळ, डायटॉम्स, प्लँक्टन आणि सूक्ष्म क्रस्टेशियन्स आपल्या विशेष चोचीद्वारे गाळून खातात. या शेवाळातील कॅरोटेनॉइड रंगद्रव्यांमुळेच फ्लेमिंगो पक्षांना त्यांचा आकर्षक गुलाबी रंग प्राप्त होतो.

“एनआरआय वेटलँडच्या मर्यादित भागावर पक्ष्यांचे अवलंबित्व वाढल्याने तेथील सूक्ष्म अन्नस्रोतांवर अतिरिक्त ताण निर्माण होऊ शकतो. त्यामुळे पक्ष्यांसाठी पर्यायी खाद्यस्थळे उपलब्ध करून देणे गरजेचे असून डीपीएस आणि टीएस चाणक्य वेटलँड्सचे पुनरुज्जीवन अत्यावश्यक बनले आहे,“ असे रायगड जिल्हा वेटलँड दस्तऐजीकरण समितीच्या सदस्या ज्योती नाडकर्णी यांनी सांगितले. फ्लेमिंगो हे निरोगी वेटलँड्सचे महत्त्वाचे निदर्शक असून पर्यावरणीय समतोल राखण्यात त्यांची भूमिका मोठी असल्याचेही त्यांनी नमूद केले.

यंदाच्या हंगामात मुंबई आणि परिसरात लेसर फ्लेमिंगोची संख्या लक्षणीय वाढल्याचे पर्यावरणवाद्यांनी सांगितले. दुसरीकडे, ग्रेटर फ्लेमिंगोनी भिगवणसारख्या गोड्या पाण्याच्या वेटलँड्सना अधिक पसंती दिली आहे. “येथे आम्हाला हजाराहून अधिक ग्रेटर फ्लेमिंगो दिसत आहेत,”
- नितीन नागरे, बर्ड ट्रेल मार्गदर्शक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT