Nitin Patil Mayor Panvel Pudhari
रायगड

Panvel Mayor Election | पनवेलमध्ये ‘बिनविरोध’ची परंपरा कायम; नितीन पाटील महापौर, प्रमिला पाटील उपमहापौर

पनवेल महानगरपालिकेच्या राजकीय इतिहासात ‘बिनविरोध’ या शब्दाने पुन्हा एकदा महत्त्वाची नोंद झाली आहे.

पुढारी वृत्तसेवा

Panvel Municipal Corporation

पनवेल : पनवेल महानगरपालिकेच्या राजकीय इतिहासात ‘बिनविरोध’ या शब्दाने पुन्हा एकदा महत्त्वाची नोंद झाली आहे. यापूर्वी नगरसेवक म्हणून बिनविरोध निवडून आलेले भाजपचे नितीन पाटील आता महापौरपदीही बिनविरोध निवडून आले असून, त्यांच्या राजकीय वाटचालीत हा एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. त्याचप्रमाणे उपमहापौरपदी भाजपच्या प्रमिला पाटील यांचीही बिनविरोध निवड झाल्याने महानगरपालिकेतील भाजपचे वर्चस्व अधिक ठळक झाले आहे.

पनवेल महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर पदासाठीची निवडणूक मंगळवारी (दि. 10) पार पडली. या निमित्ताने आयोजित विशेष सर्वसाधारण सभा ठाणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा पीठासीन अधिकारी डॉ. श्रीकृष्णनाथ पांचाळ यांच्या अध्यक्षतेखाली पनवेल येथील ‘आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात’ संपन्न झाली.

महाविकास आघाडीच्या नगरसेविका अर्चना योगेश भोईर यांनी महापौरपदासाठी दाखल केलेला उमेदवारी अर्ज माघारी घेतल्याने पीठासीन अधिकाऱ्यांनी नितीन पाटील यांची महापौरपदी बिनविरोध निवड झाल्याची घोषणा केली. त्याचप्रमाणे उपमहापौर पदासाठी लिला रतन कातकरी यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने प्रमिला पाटील यांची उपमहापौरपदी बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.

नवनिर्वाचित महापौर नितीन पाटील यांचा जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्णनाथ पांचाळ यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला, तर नवनिर्वाचित उपमहापौर प्रमिला पाटील यांचा महापालिका आयुक्त मंगेश चितळे यांनी सन्मान केला.

या वेळी सर्व नवनिर्वाचित महापालिका सदस्यांसह आयुक्त मंगेश चितळे, अतिरिक्त आयुक्त गणेश शेटे, परिवहन व्यवस्थापक कैलास गावडे आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक नगरसचिव नानासाहेब कामठे यांनी केले.

महापौर नितीन पाटील

पनवेल तालुक्यातील कासारभाट हे नितीन पाटील यांचे मूळ गाव असून त्यांनी यापूर्वी दोन वेळा नगरसेवक म्हणून प्रभावी कामकाज केले आहे. सभागृहातील अनुभव, विषयांची अभ्यासपूर्ण मांडणी आणि विकासाभिमुख दृष्टीकोन यामुळे ते कायम चर्चेत राहिले आहेत. मजबूत जनसंपर्क आणि नागरिकांच्या समस्या सोडविण्याची तत्परता ही त्यांची ओळख आहे.

भारतीय जनता पक्षाचे जिल्हा सरचिटणीस म्हणून त्यांनी संघटनात्मक पातळीवर उल्लेखनीय योगदान दिले आहे. अभिनव मित्र मंडळाचे कार्याध्यक्ष म्हणून विविध सामाजिक, सांस्कृतिक व सेवाभावी उपक्रम त्यांनी राबवले आहेत. तसेच ‘जाणीव’ या सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष म्हणून शिक्षण, आरोग्य, आपत्ती व्यवस्थापन आणि गरजू घटकांसाठी अनेक उपक्रम यशस्वीपणे राबवले आहेत. त्यांच्या सामाजिक, राजकीय व संघटनात्मक कार्याची दखल घेऊन त्यांच्यावर महापौरपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

उपमहापौर प्रमिला पाटील

सामाजिक कार्यकर्त्या प्रमिला पाटील यांनी आपल्या कार्याच्या जोरावर कळंबोली परिसराच्या राजकारणात स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. श्रेया महिला बचत गट व नंदिनी महिला बचत गटाच्या माध्यमातून महिलांचे आर्थिक व सामाजिक सबलीकरण करण्यासाठी त्यांनी महत्त्वपूर्ण कार्य केले आहे.

महिलांच्या प्रश्नांची सखोल जाण, तसेच तळागाळातील महिलांशी असलेला थेट संवाद यामुळे शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना प्रभावीपणे महिलांपर्यंत पोहोचवण्यात त्या यशस्वी ठरल्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT