कोप्रोली उरण: उरण न्हावा शेवा परिसरातील रिक्त कंटेनर डेपो उद्योगाने प्रशासनिक, जमीनविषयक तसेच वाहतूक व्यवस्थापनाशी संबंधित सातत्याने निर्माण होत असलेल्या समस्यांबाबत गंभीर चिंता व्यक्त केली आहे.
वारंवार केलेल्या निवेदनांनंतरही सकारात्मक संवाद व प्रभावी तोडगा न निघाल्यास, जमीनमालक, डेपो चालक व स्थानिक ग्रामस्थ यांच्या सहकार्याने संपूर्ण न्हावा शेवा परिसरातील डेपोचे कामकाज गंभीरपणे प्रभावित होऊ शकते. त्याचा थेट परिणाम देशाच्या लॉजिस्टिक्स साखळी व आयात-निर्यात (इक्झिम ) व्यापारावर होण्याची शक्यता असल्याचे न्हावा शेवा डेपो कंटेनर असोसिएशने स्पष्ट केले आहे.
या उद्योगातून थेट व अप्रत्यक्षपणे १०,२४० हून अधिक कामगारांना रोजगार मिळतो. यामध्ये स्थानिक युवक, कामगार, सर्व्हेअर्स, तंत्रज्ञ, यंत्रचालक, सुरक्षा कर्मचारी, डेपोशी संलग्न वाहतूकदार आणि विविध सेवा पुरवठादार यांचा समावेश आहे. जमीनमालक, डेपो मालक, प्रकल्पग्रस्त कुटुंबे, विक्रेते आणि पूरक उद्योग यांचा विचार करता, १२,००० हून अधिक कुटुंबांचा उदरनिर्वाह या उद्योगावर अवलंबून आहे.
बैठकीत कोविड-१९ काळातील योगदानाचाही उल्लेख करण्यात आला. त्या कठीण काळात रिक्त कंटेनर डेपो हे अत्यावश्यक सेवा म्हणून अखंड कार्यरत राहिले आणि देशाच्या आयात-निर्यात व्यापारासाठी आवश्यक असलेल्या रिक्त कंटेनरची उपलब्धता सुनिश्चित करण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.
१२५ रिक्त कंटेनर डेपो
न्हावा शेवा परिसरात १२५ हून अधिक रिक्त कंटेनर डेपो कार्यरत असून, ते दररोज सुमारे २१,३०० ट्युईज आणि दरमहा जवळपास ६.४ लाख ट्युईज रिक्त कंटेनर हाताळतात. हे डेपो कंटेनर स्वीकारणे, तपासणी, दुरुस्ती, साठवणूक आणि पुनर्वितरणाचे महत्त्वपूर्ण कार्य करतात. डेपोचे कामकाज मंदावल्यास रिक्त कंटेनरची उपलब्धता कमी होते आणि त्याचा परिणाम थेट निर्यात प्रक्रियेवर होतो.
अशा परिस्थितीचा परिणाम रिक्त कंटेनरची उपलब्धता, वाहतूक व्यवस्था, कंटेनर फ्रेट स्टेशन (सी एफ एस ), शिपिंग लाईन्स, पोर्ट टर्मिनल्स, निर्यातदार, आयातदार आणि जेएनपीएमार्फत होणाऱ्या संपूर्ण इक्झिम व्यापार साखळीवर होऊ शकतो.- संदीप नाईक, सचिव जनरल,एनएसडीसीए