New Panvel burglary gang pudhari photo
रायगड

Raigad Crime : खांदेश्वरमध्ये घरफोडी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

४ जण गजाआड; ९ गुन्हे उघड; ८ लाखांहून अधिकचा मुद्देमाल जप्त

पुढारी वृत्तसेवा

नवीन पनवेल : खांदेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत धुमाकूळ घालणाऱ्या आंतरराज्य घरफोड्यांच्या टोळीचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना मोठे यश आले आहे. पोलिसांनी अत्यंत शिताफीने ४ अट्टल चोरांना जेरबंद केले असून, त्यांच्या अटकेमुळे तब्बल ९ गंभीर गुन्हे उघडकीस आले आहेत. आरोपींकडून ८ लाख १७ हजार ७०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या संपूर्ण यशस्वी कामगिरीची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त मयूर भुजबळ यांनी १ ऑक्टोबर रोजी खांदेश्वर पोलीस ठाण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

मिळालेल्या माहितीनुसार, ९ ऑगस्ट २०२६ रोजी खांदेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका घराचे कुलूप तोडून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरीला गेली होती. या गुन्ह्याचा समांतर तपास खांदेश्वर पोलिसांचे गुन्हे प्रकटीकरण पथक करत होते.

वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाचा आधार घेतला. या तपासाअंती पोलिसांनी २० ते २२ सप्टेंबर २०२६ दरम्यान आंतरराज्य टोळीतील ४ आरोपींना बेड्या ठोकल्या. या टोळीच्या अटकेमुळे पोलीस आयुक्तालय क्षेत्रातील अनेक गुन्ह्यांची उकल झाली आहे.

यामध्ये खांदेश्वर पोलीस ठाण्यातील ६ गुन्हे, पनवेल शहर पोलीस ठाण्यातील १ गुन्हा, तसेच रबाळे आणि तळोजा पोलीस ठाण्यातील प्रत्येकी १ गुन्हा अशा एकूण ९ गुन्ह्यांचा समावेश आहे. धक्कादायक बाब म्हणजे या आरोपींवर यापूर्वीही रबाळे, मुंब्रा, विष्णुनगर, कोपरखैरणे आणि खांदेश्वर पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल असून ते रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत.

१४ तोळे सोन्यासह लॅपटॉप, मोबाईल जप्त

पोलीस कोठडीत घेतलेल्या आरोपींची कसून चौकशी केली असता त्यांनी अनेक चोऱ्यांची कबुली दिली. पोलिसांनी त्यांच्याकडून चोरीचा मोठा मुद्देमाल हस्तगत केला आहे, ज्यामध्ये १४ तोळे सोन्याचे दागिने ४ महागडे मोबाईल फोन, १ लॅपटॉप रोख रक्कम आणि इतर इलेक्ट्रॉनिक साहित्य अशा एकूण ८,१७,७०० रुपयांच्या ऐवजाचा समावेश आहे. ही यशस्वी कामगिरी नवी मुंबईचे पोलीस आयुक्त, सह-पोलीस आयुक्त, अप्पर पोलीस आयुक्त आणि परिमंडळ २ च्या पोलीस उपायुक्तांच्या मार्गदर्शनाखाली खांदेश्वर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने केली आहे, अशी माहिती देण्यात आली.

बिहारहून येऊन चोऱ्या

अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये प्रामुख्याने वहीद आलम मोहम्मद जलाल राव (वय २०, रा. सुकापूर, पनवेल, मूळ राहण बिहार) आणि राजमुल कमरुल खान (वय २४, राहणार वाशी, नवी मुंबई, मूळ रा. बिहार) यांचा समावेश आहे. हे आरोपी मूळचे बिहारचे असून ते नवी मुंबई, पनवेल परिसरात वास्तव्यास राहून बंद घरांना आपले लक्ष्य करत असत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT