नेरळ : नेरळ पोलीस ठाणे हद्दीतील माणगाव आदिवासी वाडी येथे राहणाऱ्या आदिवासी तरूणाने दामत गावांतील विटभट्टी मालकाकडून विटभट्टीवर कामा करणाऱ्याच्या बदल्यात पैशाची उचल करून तो कामावर जात नसल्याने, विटभट्टी मालकांनी त्या आदिवासी तरूणाच्या दोन प्रसुती झालेल्या २ पत्नींना त्यांच्या लहान ३ मुलींसह जबरदस्तीने टेम्पोत टाकून दामत येथील विटभट्टीवर आणून गेले ८ दिवस डांबून नजर कैदेत ठेवले होते.
या प्रकरणी नेरळ पोलीसांत वेठबिगार मुक्ती कायद्याअंतर्गत विटभट्टी मालक समिर नजे व अब्दुल्ला नजे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघेही फरार असून त्यांचा शोध पोलीस घेत आहेत. दरम्यान, पोलीसांनी या पीडितांची मुक्तता केली आहे.
नेरळ पोलीस ठाणे हदद्दीतील दामत गावात राहाणारे समिर नजे व त्याचे वडिल अब्दुल्ला नजे यांचा विटभट्टीचा व्यावसाय आहे. त्यांच्या विटभट्टीवर काम करण्याच्या बदल्यात माणगाव आदिवासी वाडीतील आदिवासी तरूण दर्शन विजय मिरकुटे (वय२३) यांनी मे २०२५ च्या शेवटच्या आठवडयात २७ हजार ५०० रूपांची उचल घेतली (आगाऊ मजूरी) होती. विटभट्टी मालक समिर नजे यांने, विटभट्टी सुरू करत आहे. तू तुझ्या बायकांसह विटभट्टीवर कामाला ये असे दर्शन मिरकुटे याला कळविले होते. त्या वेळेस दर्शन विजय मिरकुटे याने मी गावाची यात्रा झाल्यावर येतो असे सांगितले होते.
मात्र दर्शन मिरकुटे हा विटभट्टीवर कामाला जात नसल्याने, १९ नोव्हेंबर २०२५ रोजी दर्शन मिरकुटे हा घरी नसताना व त्यांची आई कांता विजय मिरकुटे, वडील विजय कृष्णा मिरकुटे तसेच त्यांच्या दोन पत्नी अनुक्रमे सारिका दर्शन मिरकुटे व रोशनी दर्शन मिरकुटे, आणि त्यांची पाच लहान मुले घरात होते.
दर्शन मिरकुटे याच्या दोन पत्नी पैकी सारिका हिची १९ नोव्हेंबर रोजी तर दुसरी पत्नी रोशनी हिची १३ नोव्हेंबर रोजी प्रसुती झाली आहे. अशा परिस्थितीत विटभट्टी मालकांनी दर्शन मिरकुटे यांच्या माणगाव आदिवासी वाडीतील राहात्या घरातून त्यांच्या दोन नवप्रसुत पत्नीसह लहान तीन बाळकांना जबरदस्तीने पिकप टेम्पोत भरले. त्यांना टेम्पोतून घेवून जाताना, माझे पैसे दुपट्टीने परत करून यांना घेऊन जा असे दर्शनची आई कांता विजय मिरकुटे आणि वडील विजय कृष्णा मिरकुटे यांना सांगून धमकावले.
८ दिवस ठेवले नजरकैदेत
माणगांव आदिवासी वाडीतून दर्शन मिरकुटे यांच्या प्रसुती झालेल्या दोन पत्नीसह लहान तीन मुलांना दामत येथील विटभट्टीवर आणून त्यांना वेठीस धरून डांबून ठेवून गेले सात दिवस नजर कैदेत ठेवले होते. मानवतेला काळीमा फासणाऱ्या या घटने संदर्भात आदिवासी समाज संघटनेने आवाज उठवत नेरळ पोलीस ठाण्यात हा गंभीर प्रकार सांगीतला असता नेरळ पोलीसांनी तत्काळ दामत येथील विटभट्टीवर पोहोचून दोन महिला व त्यांच्या लहान तीन लहान मुलांची मुक्तता केली आहे.
वीटभट्टी मालक फरार, नेरळ पोलीस मागावर
नेरळ पोलीस ठाण्यात वीटभट्टी मालक समीर नजे व त्याचे वडिल अब्दुल्ला नजे यांच्या विरोधात वेठबिगारीमुक्त कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान समीर नजे व त्याचे वडिल अब्दुल्ला नजे हे फरार असून त्यांचा शोध नेरळ पोलीस घेत आहेत. या प्रकरणी पूढील तपास नेरळ पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक प्राची पांगे या करीत आहेत. दरम्यान, या घटनेमुळे कर्जत तालुक्यात एकच खळबळ माजली आहे. यापूर्वी असे प्रकार तालुक्यात घडलेले आहेत.